~ केरळला जाणाऱ्या २६ सदस्यीय गौर्स संघात 23 वर्षांखालील 9 आणि 6 परदेशी खेळाडूंचा समावेश ~
गोवा खबर: केरळ येथे होणार्या हिरो सुपर कप फुटबॉल स्पर्धेसाठी गतविजेता एफसी गोवाने २६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ब्रॅंडन फर्नांडिसच्या नेतृत्वाखालील संघात 23 वर्षांखालील 9 आणि 6 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. जेतेपद राखण्यासाठी सज्ज असलेल्या एफसी गोवाची सलामीची लढत 10 एप्रिल रोजी जमशेदपूर एफसीविरुद्ध होईल. सुपर कप स्पर्धेसाठी रायन मेनेझिससह दहा उदयोन्मुख आणि प्रतिभावान खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
सुपर कपमध्ये मुख्य प्रशिक्षक कार्लोस पेना यांच्या मार्गदर्शनाखालील मेन इन ऑरेंज टीमचा सी गटात समावेश आहे. या गटात एटीके मोहन बागान आणि जमशेदपूर एफसी या इंडियन सुपर लीगमधील (आयएसएल) सहकारी क्लबसह आय-लीगमधील गोकुलम केरळ एफसीचा समावेश आहे.

हिरो सुपर कपच्या नियमांनुसार सहभागी क्लबना त्यांच्या संघात सहा परदेशी खेळाडूंची नोंदणी करता येणार आहे. यात किमान एक खेळाडू आशियाई फुटबॉल महासंघ (एएफसी) सदस्य राष्ट्राचा असणे बंधनकारक आहे. त्यानुसार, एफसी गोवाने अल्वारो वाझक्वेझ, इकर ग्वारोटक्सेना, एडू बेडिया, हर्नान सॅन्ताना (सर्व स्पेनमधील) आणि नोहा सदाओई (मोरोक्को) तसेच एएफसी कोट्यातून सीरियाचा फारेस अर्नाउट याचा गौर्स संघात समावेश करण्यात आला आहे. गतविजेता एफसी गोवाचा संघ यंदाच्या सुपर कपमधील सर्वात तरुण संघांपैकी एक आहे. ज्यामध्ये तब्बल नऊ खेळाडू हे 23 वर्षांखालील आहेत.
एफसी गोवा संघ:
गोलरक्षक: धीरज सिंग, अर्शदीप सिंग, हृतिक तिवारी.
बचावपटू: सॅनसन परेरा, अन्वर अली, फारेस अरनाउट, लिएंडर डी’ कुन्हा, निखिल प्रभू, सेरिटन फर्नांडिस, सेव्हियर गामा, आयबान्भा डोहलिंग, हर्नन सँताना, लेस्ली रेबेलो, रायन मेनेझिस.
मिडफिल्डर: ब्रँडन फर्नांडिस, आयुष छेत्री, माकन चोथे, रिडीम त्लांग, एडू बेडिया, लेनी रॉड्रिग्स, ब्रिसन फर्नांडिस, लालरेमरुता एच. पी.
फॉरवर्डः नोहा सदाउई, देवेंद्र मुरगावकर, इकेर ग्वारोटक्सेना, अल्वारो वाझक्वेझ.
शेवटची हिरो सुपर कप स्पर्धा 2018-19 मध्ये खेळली गेली. त्यात एफसी गोवा क्लब विजेता ठरला. गतविजेता क्लब यंदाच्या मोहिमेची सुरुवात 10 एप्रिल रोजी जमशेदपूर एफसीविरुद्ध करतील. गौर्सचा गटवार साखळीतील दुसरा सामना १४ एप्रिल रोजी गोकुलम केरळशी होईल आणि चार दिवसांनंतर तिसर्या सामन्यात एटीके मोहन बागानशी दोन हात करतील. गटवार साखळीतील सर्व सामने कोझिकोडे येथील ईएमएस कॉर्पोरेशन स्टेडियमवर होतील.
स्पर्धेतील चार गटांमधील विजेता उपांत्य फेरीसाठी पात्र ठरेल. उपांत्य फेरीच्या लढती 21 आणि 22 एप्रिल रोजी रंगतील. हिरो सुपर कप स्पर्धेचा अंतिम सामना 25 एप्रिल रोजी ईएमएस कॉर्पोरेशन स्टेडियमवर होईल.