गोवा खबर:कृषी दुरूस्ती विधेयकाबाबत काँग्रेस आमदार कार्लोस अल्वारेस फरेरा यांनी दिलेला पाठींबा, काँग्रेस आणि भाजपमधील समन्वय दर्शवते अशी घणाघाती टीका आम आदमी पक्षाचे अध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी बुधवारी केली.
फरेरा हे वारंवार भाजपच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होताना अनेकदा पाहण्यात आले आहे. काँग्रेसचा भाजप सरकारसोबत हातमिळवणी करण्याचा इतिहास आहे. आता पुन्हा एकदा गोव्यातील काँग्रेसचे दोन आमदार विक्रीसाठी आले आहेत आणि भाजपचे बी. एल. संतोष हे सौदा पूर्ण करण्यासाठी गोव्यात आले असावेत, असे पालेकर म्हणाले.
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात फरेरा यांनी राज्य सरकारच्या हेतूंना पाठिंबा दर्शविला आणि किरकोळ बदल करून कायदा मंजूर केला जाऊ शकतो असा प्रस्ताव मांडला. फरेरा यांनी विधानसभेत कायदेशीर सल्लागार म्हणून काम न करता आमदार म्हणून काम करावे, असा सल्ला पालेकर यांनी दिला.
आप आमदार कॅप्टन व्हेंझी व्हिएगस म्हणाले, “आम्ही आमदार या नात्याने लोकांना फायदा होईल असे कायदे तयार करण्यासाठी सरकारला मदत करू शकतो. परंतु आम्ही सल्लागार म्हणून काम करू शकत नाही. शिवाय, सरकार घाईघाईत विधेयक संमत करून घेताना तो वेळ शिफारशीसाठी नाही तर वादविवाद आणि चर्चेसाठी राखून ठेवण्यात आला होता”.
सरकारला कायदेशीर सूचना हव्या असतील तर त्यांनी स्वतःच्या कायदेशीर विभागाची मदत घ्यायला हवी होती अन्यथा सरकारने अधिकृतपणे फरेरा यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करावी, असा सल्ला व्हिएगस यांनी दिला.
आप उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी गेल्या सहा वर्षातील काँग्रेस आमदारांच्या पक्षांतराचा इतिहास सांगितला, ज्यात 28 पैकी 24 काँग्रेस आमदार भाजपात गेले आहेत. हळदोणा आमदाराचा भाजपकडे कल असल्याचे दाखवणाऱ्या अनेक घटनांवर त्यांनी प्रकाश टाकला. नाईक म्हणाले की, त्यांच्या पक्षाचा त्यांच्यावर विश्वास नाही, त्यामुळेच त्यांची पात्रता असूनही विरोधी पक्षनेतेपदी त्यांची नियुक्ती केली नाही.
फरेरा भाजपसाठी काम करत असल्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे काँग्रेसच्या सर्व उमेदवारांनी निवडणुकीपूर्वी स्वाक्षरी केलेले तथाकथित पक्षांतरविरोधी प्रतिज्ञापत्र. कायदेशीर दस्तऐवजावर स्वतः स्वाक्षरी करूनही, त्यांनी पक्षांतरानंतर दावा केला की त्याचे कोणतेही मूल्य नाही. 33 आमदार असल्यामुळे भाजप हवे ते कायदे करू शकते, फरेरा यांचे हे विधान त्यांच्याकडे भाजपशी लढण्याची इच्छाशक्ती नसल्याचे दर्शवते, असा आरोप नाईक यांनी केला.
भाजपला पराभूत करणे ही एक वैचारिक लढाई आहे ज्यासाठी खूप धैर्य आणि त्याग करावा लागतो. ‘आप’च्या आमदारांनी गोव्यातील जनतेसाठी लढा सोडला नाही आणि सोडणार नाही. फरेरा यांनी एकतर भाजपमध्ये प्रवेश करावा किंवा भाजपविरोधात हार मानल्यास त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे आवाहन नाईक यांनी केले.