गोवा खबर:फोंडा येथील नवीन बसस्थानकावर लावण्यात आलेल्या आणि अश्लीलतेला प्रोत्साहन देणार्या निरोधाच्या विज्ञापन फलकावर कारवाई करण्याची मागणी ‘रणरागिणी’ने फोंडा येथील उपजिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी ‘रणरागिणी’च्या शिष्टमंडळामध्ये सौ. जोत्स्ना जगताप, श्रीमती नयन नाईक, कु. सुरभी छत्रे, सौ. रेश्मा तळावलीकर, सौ. अदिती सरोदे, सौ. रेखा कोलवेकर, सौ. श्रृती हजारे, सौ. हर्षा गुरव आदींचा सहभाग होता.

निवेदनात म्हटले आहे की, फोंडा येथील नवीन कदंब बसस्थानकावर अश्लीलतेला प्रोत्साहन देणारे ‘मॅनकाईंड’ कंपनीच्या ‘ईपीक कंडोम’चे विज्ञापन मोठ्या फलकावर लावण्यात आले आहे. या फलकावरील मजकूर अश्लीलतेला प्रोत्साहन देणारा आहे. केंद्रशासनाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या एका अहवालात गोवा राज्य हे ‘सेक्स ट्रेड’चे प्रमुख ठिकाण असल्याचे म्हटल्याने गोव्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर अपकीर्ती झाली आहे. या स्थितीमध्ये अश्लीलतेला प्रोत्साहन देणारी विज्ञापने आणखीनच भर घालत आहेत. वास्तविक गोवा ही परशुरामभूमी म्हणून परिचित आहे; मात्र दुर्दैवाने सद्यस्थितीत पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली चंगळवाद आणि भोगवाद यांसाठी गोव्याचे नाव प्रसिद्ध झालेे आहे. या दृष्टीने फोंडा येथील नवीन कदंब बसस्थानकावर लावण्यात आलेले हे फलक त्वरित हटवावेत.