Connect with us

गोवा खबर

आयर्नमॅन ७०.३ गोवा २०२२ मध्ये दिसणार ‛कपल पॉवर’

Published

on

Spread the love

 

गोवा खबर : रविवार, १३ नोव्हेंबर रोजी पणजी येथे होणाऱ्या आयर्नमॅन ७०.३ गोवामध्ये ट्रायथलीट जोडपी आपली उपस्थिती लावतील.आयर्नमॅन ७०.३ गोवा स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीत ट्रायथलीट्स १.९ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकल आणि २१ किलोमीटर धावणे हे सलगपणे साडेआठ तासांच्या आत पूर्ण करायचे आहे. स्पर्धेत भारतासह अन्य २१ देशातून १३०० हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत.

मध्य प्रदेशातील हरदा शहरातील ब्रिगेडियर (निवृत्त) राजेश जोशी (५९) आणि त्यांची पत्नी पूनम (५६) हे ट्रायथलॉन जोडपे दुसऱ्यांदा या शर्यतीत भाग घेणार आहे. या दोघांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये शर्यतीची पहिली आवृत्ती यशस्वीरित्या पूर्ण केली होती. शर्यतीच्या दिवसाच्या चार आठवडे आधी गोव्यात आलेले हे जोडपे आयर्नमॅन सारख्या खेळात अनुकूलतेच्या महत्त्वावर भर देतात. राजेश म्हणतात की, “गोव्यातील अनुकूलता ही चांगली कामगिरी करण्याची गुरुकिल्ली आहे. गोव्याची आर्द्रता आणि उष्णता ही आव्हाने उभी करतात .मात्र योग्य परिस्थितीनुसार आणि प्रत्यक्ष मार्गांवर सराव करून त्यावर मात करता येते.”

पन्नाशीच्या उत्तरार्धात असलेल्या या जोडप्याला या आव्हानात्मक खेळात सहभागी होण्यास कोणतीही शंका नाही. ते म्हणाले, “सहनशीलतेसाठी शिस्त आणि आव्हान साध्य करण्याची इच्छाशक्ती लागते.  यश मिळवणाऱ्या तरुणांच्या ताकदीची जागा चांगल्या तंत्राने आणि साध्य करण्याच्या इच्छाशक्तीने घेतली जाते.

बेंगळुरू येथील सनी गुप्ता (२८) आणि देवांशी गुप्ता (२८) हे तरुण जोडपे यावर्षी त्यांच्या पहिल्या शर्यतीसाठी उत्सुक आहेत. जाहिरात व्यावसायिक असणारे सनी गुप्ता म्हणाले की, “मी काही वर्षांपूर्वी आयर्नमॅन शर्यतींबद्दल ऐकले होते, परंतु बहुतेक शर्यती परदेशात आयोजित केल्या जात असल्याने माझ्यासाठी ते शक्य नव्हते. पण जेव्हा आयर्नमॅन  ७०.३ गोवा ची घोषणा झाली तेव्हा मी आणि माझ्या पत्नीने त्यासाठी नोंदणी करण्याचा निर्णय घेतला,”.

देवांशी म्हणाल्या की त्यांना त्यांच्या पतीकडून प्रेरणा मिळाली . “सनी हा माझा सर्वात मोठा आधार आणि प्रेरणा आहे. आम्ही गेल्या एक वर्षापासून प्रशिक्षण घेत आहोत आणि गोव्यातील शर्यतीचा अनुभव घेण्यासाठी आणि वातावरणात रंग भरण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”