गोवा खबर:क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी जुलै २०२२ मध्ये कांपाल स्विमिंग पूल संकुलाचे उद्घाटन करून पणजी आणि राज्यातील लोकांना मूर्ख बनवले आहे. संकुलात अनेक तांत्रिक बिघाड असल्यामुळे आजही अनेकांना याचे लाभ घ्यायला मिळत नसल्याचा आरोप आम आदमी पार्टीचे उपाध्यक्ष वाल्मिकी नाईक यांनी सोमवारी केला.
कांपाल संकुलाचे तथाकथित उद्घाटन हे दुसरे तिसरे काही नसून कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांची नाट्यनिर्मिती आहे. हा उद्घाटन सोहळा भाजपसाठी आणखी एक इव्हेंट मॅनेजमेंट संधीच आहे, अशी टिप्पणी नाईक यांनी केली.
जिथून जलतरणपटू डुबकी मारतात ते सुरुवातीचे ब्लॉक उद्घाटनानंतर गायब झाले आहेत. आंतरराष्ट्री य मापदंडानुसार फिल्ट्रेनशन प्लांट बसवण्यात आल्याची माहिती दिली होती. मात्र तेही आता काम करत नाही. उद्घाटनावेळी प्रसारमाध्यमांचे जिथून स्वागत करण्यात आले ते प्रवेशद्वार आता कार्यान्वित नाही. सध्या संकुल एखाद्या बांधकाम साइटसारखे दिसत आहे. त्यामुळे क्रीडामंत्री यांनी आयोजित केलेला उद्घाटन सोहळा बनावट असल्याचा आरोप नाईक यांनी केला.
स्विमिंग पूलचे नूतनीकरणही प्रत्यक्षात पूर्ण झालेले नाही. संकुलात मोठ्या प्रमाणात गळती असल्याने दररोज 8-10 टँकरच्या सहाय्याने पाणी भरले जाते, असे नाईक म्हणाले.
कांपाल साग स्विमिंग पूल केवळ पणजीतील रहिवासी नाही तर सांताक्रुझ, पर्वरी, ताळगाव आणि इतर आसपास गावातील रहिवासी करत होते. नूतनीकरणाचे निमित्त सांगून मागील तीन वर्षांपासून हा स्विमिंग पूल जनतेसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील जलतरणपटूंना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला. त्यांच्या प्रशिक्षणात अडथळा निर्माण झाला, अशी माहिती नाईक यांनी दिली.
कांपाल संकुल केवळ खेलो इंडिया जलतरणपटूंसाठीच नाही तर सर्वसामान्यांसाठीही लवकरात लवकर खुला करावा, अशी मागणी नाईक यांनी केली.
गोविंद गावडे जे खाते हाताळतात, तेथील प्रकल्प वादात सापडतात. ते नागरी पुरवठा मंत्री असताना 200 टन तूर डाळ सडली. कला आणि संस्कृती मंत्री असताना त्यांनी कला अकादमी उद्ध्वस्त केली. आता क्रीडामंत्री या नात्याने त्यांनी जलतरण तलावाच्या संकुलाची दुरवस्था केली आहे आणि प्रत्यक्षात या आपत्तीचे उद्घाटन केले, नाईक म्हणाले.
आप नेते सुनील सिंगणापूरकर यांनी खेळाडूंच्या गरजांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याबद्दल क्रीडा मंत्रीवर टीका केली. गेल्या तीन वर्षांपासून राज्य जलतरणपटूंना प्रशिक्षणासाठी पेड्डे मैदानावर जावे लागत असल्याचे सांगून त्यांनी पूल संकुल लवकरात लवकर तयार करण्याची मागणी केली.
खेलो इंडिया खेळाडूच्या निवासस्थानात घोटाळा झाल्याचा आरोप करत सिंगणापूरकर म्हणाले, “डिचोली येथील एका लग्नाच्या कॅटररला जेवणाचे कंत्राट देण्यात आले आहे. आता खेळाडूंसाठी बनवलेल्या आरोग्यदायी अन्नाऐवजी केटरर खेळाडूंना चिकन शाकुती आणि पनीर बटर मसाला देत आहे, जे त्यांच्या आरोग्यासाठी आणि कामगिरीसाठी अत्यंत हानिकारक आहे.”