गोवा खबर:स्वाध्याय परिवाराचा रक्षाबंधन सोहळा ११ ऑगस्ट रोजी पणजीच्या कांपाल मैदानावर अत्यंत उत्साहात पार पडला. साधारण दहा हजार स्वाध्यायींच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
यातील युवक-युवतींची उपस्थिती लक्षणीय होती. विशेष म्हणजे पावसाची, चिखलाची तमा न बाळगता हजारों स्वाध्यायी पावसात मैदानावर बसून होते, कार्यक्रम सुरू व्हायच्या आधी पाऊस आला तरी कुठेही गडबड नाही, गोंधळ झाला नाही. स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख धनश्रीदीदी तळवलकर यांचे व्यासपीठावर आगमन झाले आणि जमलेल्या स्वाध्यायींच्या आनंदाला उधाण आलं. दीदींचे गोवेकरांतर्फे स्वागत करण्यात आहे आणि त्यानंतर जवळपास साडेपाचशे युवक-युवतींनी ‘वंदी तुज गोमंतक अवघा पांडुरंग आत्मजा’ या नृत्यगीताद्वारे दीदींचे स्वागत केले. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे साधारण सहा च्या सुमारास आगमन झाले आणि मुख्यमंत्र्यांनी समस्त गोवा राज्यातर्फे धनश्रीदीदींचे स्वागत केले. दोन गोव्यातील स्वाध्यायी बंधूंनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले.

धनश्रीदीदींनी आपल्या प्रवचनात रक्षाबंधनाचे महत्त्व विशद केले. दीदी म्हणाल्या ‘कदाचित रक्षाबंधन हा एकाच असा उत्सव असेल की जो नात्याचा उत्सव आहे आणि जो इतक्या प्रमाणात साजरा केला जातो. आई-मुलगा, बाप-मुलगा यांचे पण उत्सव असतात परंतु बहीण-भावाच्या नात्याचा हा एकाच नात्याचा उत्सव आहे जो भारतभर उत्साहाने साजरा केला जातो. महापुरुषांच्या, नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथी आपण साजऱ्या करतो पण भावा-बहिणीचा हा एकाच उत्सव असेल जो सर्व साजरे करतात. मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजते आणि माझी एक खूप मोठी श्रीमंती आहे की मला तुमच्यासारखे लाखो भाऊ आहेत. विश्वात मला वाटतं की मी एकाच अशी बहीण असेन की जिला लाखो भाऊ मिळालेत.’. दीदींनी पुढे सांगितले की रक्षा ही केवळ शरीराची नव्हे तर आपल्या ‘स्व’ ची, आपल्या ‘जीवात्म्याची’, आपल्या ‘मी’ ची रक्षा व्हायला हवी. आपल्या मनाची, आपल्या विचारांची रक्षा व्हायला हवी. आणि तशी रक्षा करणे जगात कुठल्याच भावाला शक्य नाहीये. तशी आपली रक्षा केवळ भगवंतच करू शकतो. भगवद्गीता ही आपले रक्षा कवच आहे. प्रतिकूलतेत उभं राहाण्याची ताकद, मी करू शकतो, I can do ही ताकद फक्त गीताच देऊ शकते. गीतेच्या तत्त्वज्ञानात सर्व प्रश्नाची आणि समस्यांची उत्तरे आहेत, फक्त ती आपण समजून घेतली पाहिजेत.
दीदींच्या उद्बोधनानंतर रक्षाबंधनाचा हा नेटका कार्यक्रम संपूर्ण झाला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याप्रमाणेच गोव्याचे महापौर रोहित मोन्सेरात, आमदार दिगंबर कामत, विरेश बोरकर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होती. स्वाध्याय परिवाराच्या शिस्तीनुसार कार्यक्रम संपल्यावर कुठेही गोंधळ, गडबड न होता सर्व स्वाध्यायी आपापल्या ठिकाणी मार्गस्थ झाले. पावसाच्या वातावरणात अशा मोकळ्या मैदानावर कार्यक्रम कसा काय आयोजित केलाय असं बऱ्याच गोवेकरांना वाटत होतं पण विशेष म्हणजे कार्यक्रम सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत वरुणराजाने कृपा केली आणि रक्षाबंधन कार्यक्रम यथासांग पार पडला.