Connect with us

गोवा खबर

नवनिर्वाचित आमदारांसाठी आयोजित प्रशिक्षण सत्रावर ‘आप’चा बहिष्कार

Published

on

Spread the love
गोवा खबर:आम आदमी पक्षाचे बाणावलीचे आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस आणि वेळ्ळीचे आमदार इंजीनियर क्रूझ सिल्वा यांनी सोमवारी (आज) गोवा विधीमंडळ विभागाने नवनिर्वाचित आमदारांसाठी आयोजित केलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण सत्रावर बहिष्कार टाकला. 
सोमवारपासून सुरू झालेले प्रशिक्षण सत्र गोवा विधीमंडळ विभागाने पुणे स्थित रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या संयुक्त विद्यमाने पंचतारांकित हॉटेल मध्ये आयोजित केले आहे.
प्रशिक्षण देण्यासाठी निवडलेली संघटना ही भाजपची प्रचारक संस्था असून अशा संघटनेला विधानसभेच्या महत्त्वपूर्ण कामकाजासंबंधित नवनिर्वाचित आमदारांना प्रशिक्षण देण्यासाठी सचिवालयाने आमंत्रण करणे चुकीचे आहे, अशी टीका आपने केली.
विधानसभा संकुलातच 2017 मध्ये देखील याप्रकारचे प्रशिक्षण सत्र केवळ एक दिवसासाठी आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी संशोधन आणि राजकीय पारदर्शकतेमध्ये एक स्वतंत्र आणि आदरणीय नाव असलेली पीआरएस इंडिया या संस्थेमार्फत प्रशिक्षण देण्यात आले होते, असे आप ने म्हटले.
गोवा विधानसभेने 40 पैकी 19 आमदार पहिल्यांदा विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आखला होता.
आपचे बाणावलीचे आमदार कॅप्टन व्हेन्झी व्हिएगस म्हणाले की विधीमंडळ विभागाकडे आधीच चांगले प्रशिक्षित कर्मचारी आहेत ज्यांना याप्रकारचे प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यासाठी आरएसएस-समर्थित अशासकीय संस्था (रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी) च्या मदतीची आवश्यकता नाही.
“विधीमंडळ विभागातील प्रशिक्षित कर्मचारी सभागृहाच्या प्रक्रिया समजण्यास आमदारांना सक्रियपणे मदत करत आहेत,” असे नमूद करून ते म्हणाले की, त्याच कर्मचार्‍यांनी आमदारांना अधिक चांगले प्रशिक्षण दिले असते.  राज्यात सुसज्ज असे विधानसभा संकुल असताना हा कार्यक्रम पंचतारांकित रिसॉर्टमध्ये का आयोजित करण्यात आला, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.