मानवाच्या अस्तित्वासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा या जीवनाच्या मूलभूत गरजा असून त्याशिवाय उपजीविका टिकवणे अत्यंत कठीण आहे. मात्र, जगभरात कोविड -१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर, ज्या वेळी आपल्या देशांत कोविड संकटामुळे कोरोना प्रकरणांमध्ये प्रचंड वाढ होत होती, अशा वेळी केंद्रातील सरकारने देशात कोणीही उपाशी राहू नये, यासाठी तातडीने उपाययोजना आखल्या आणि महामारीच्या काळात लोकांना होणारे त्रास कमी केले. या दिशेने एक निर्णायक पाऊल म्हणून जीवनावश्यक वस्तू/अन्नधान्याच्या पुरवठ्यासाठी योग्य सार्वजनिक वितरण व्यवस्था सुनिश्चित करण्यास, भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालय, नवी दिल्ली ने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना (पीएम जीकेएवाय) सुरू करून अंमलात आणली. कोविड -१९ महामारीचा सामना करण्यासाठी देशातील सुमारे ८० कोटी गरीब लोकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने पीएम जीकेएवाय योजना राबविण्यात आली.
टप्प्याटप्प्याने राबविण्यात आलेली ही योजना सुरुवातीला एप्रिल २०२० ते जून २०२० या ३ महिन्यांच्या कालावधीसाठी राबविण्यात आली, ज्यामध्ये प्रति व्यक्ती, प्रति महिना ५ किलो तांदूळ आणि प्रति रेशनकार्ड १ किलो तूरडाळ मोफत देण्यात आली. गोव्यात, राष्ट्रीय अन्न सुरक्षा (एनएफएसए) लाभार्थ्यांना, म्हणजेच राज्यातील एएवाय आणि पीएचएच कार्डधारकांना दरमहा प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ आणि प्रति रेशनकार्ड १ किलो तूरडाळ वितरित करण्यात आली. या कालावधीत ७८०९ मेट्रिक टन तांदूळ आणि ४१६ मेट्रिक टन तूरडाळ नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाकडून वितरित करण्यात आली आणि गोवा राज्यातील सरासरी ५,२२,२७० लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
ही योजना पुढील ५ महिन्यांच्या कालावधीसाठी जुलै २०२० ते नोव्हेंबर २०२० टप्पा – २ म्हणून वाढविण्यात आली आणि लाभार्थींना प्रति व्यक्ती, प्रति महिना ५ किलो तांदूळ आणि प्रति रेशनकार्ड, प्रति महिना १ किलो चणे मोफत देण्यात आले. या टप्प्यात विभागाकडून १२,७७६ मेट्रिक टन तांदूळ आणि ६८० मेट्रिक टन चणे वितरित करण्यात आले आणि सुमारे ५१,१०४ लाभार्थ्यांनी ५ महिन्यांच्या कालावधीसाठी याचा लाभ घेतला.
कोविड -१९ महामारीच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आणि राज्य तसेच देशभरात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही योजना पुन्हा टप्पा – ३ म्हणून २ महिन्यांच्या कालावधीसाठी म्हणजेच मे २०२१ ते जून २०२१ या कालावधीसाठी वाढवण्यात आली. या टप्प्यात, एनएफएसए लाभार्थ्यांना प्रतिकिलो ५ किलो तांदूळ प्रति महिना मोफत देण्यात आले. या टप्प्यात ५,३५१ मेट्रिक टन तांदूळ वितरित करण्यात आला आणि सुमारे ५,३०,४५७ लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
पुढे, या योजनेचा लाभ जुलै २०२१ ते नोव्हेंबर २०२१ पर्यंत ५ महिन्यांच्या कालावधीसाठी टप्पा – ४ म्हणून वाढविण्यात आला आणि लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती, प्रति महिना ५ किलो तांदूळ मोफत देण्यात आले. या टप्प्यात १३,१२३ मेट्रिक टन तांदूळ वितरीत करण्यात आले आणि तब्बल ५,३०,००० लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
गोव्यात या योजनेचा लाभ गरजू आणि पात्र लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि एनएफएसए लाभार्थ्यांमध्ये या योजनेबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी, माशेल येथील केटीसीएल हॉलमध्ये मुख्यमंत्री आणि तत्कालीन नागरी पुरवठा मंत्री यांच्या उपस्थितीत “अन्न उत्सव” कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हे कार्यक्रम काणकोण व सांगे तालुक्यातही झाले. परंतु, विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झाल्यामुळे, इतर तालुक्यांमध्ये नियोजनानुसार सदर कार्यक्रम होऊ शकले नाहीत.
पुढे, ही योजना टप्पा – ५ म्हणून डिसेंबर २०२१ ते मार्च २०२२ पर्यंत आणखी ४ महिन्यांसाठी वाढवण्यात आली आणि लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती, प्रति महिना ५ किलो तांदूळ मोफत देण्यात आले. या टप्प्यात एनएफएसए कार्डधारकांना १०,५४० मेट्रिक टन तांदूळ वितरित करण्यात आले आणि सुमारे ५,२५,१०० लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला.
आता, ही योजना एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२२ या सहा महिन्यांच्या कालावधीसाठी टप्पा – ६ म्हणून वाढवण्यात आली आहे. एप्रिल आणि मे २०२२ या महिन्यासाठी एनएफएसए लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत मोफत साठ्याचे वितरण करण्यात आले आहे. मे २०२२ मध्ये ४,५५,१३६ लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.
सध्याच्या टप्प्यात, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाने एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२२ या सहा महिन्यांसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या (पीएम – जीकेएवाय) विस्ताराबाबत आवश्यक ती जागृती निर्माण करण्यासाठी, सर्व १२ तालुक्यांमध्ये आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत “अन्न योजना” साजरी केली.
राजीव गांधी कला मंदिर, फोंडा येथे ४ मे २०२२ रोजी नागरी पुरवठा मंत्री श्री. रवी नाईक, जलस्त्रोत तथा सहकार मंत्री, श्री. सुभाष शिरोडकर आणि नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार संचालक श्री. सुधीर केरकर, यांच्या उपस्थितीत एक प्रमुख समारंभ पार पडला. नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागातर्फे फोंडा तालुक्यातील काही निवडक राष्ट्रीय अन्न सुरक्षा लाभार्थ्यांना मंत्री रवि नाईक यांच्या हस्ते विशेषत: प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेसाठी (पीएम – जीकेएवाय) योग्य ब्रँडेड अन्नधान्याच्या पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
गरिबांची स्थिती आणि जीवनमान सुधारण्यासाठी, राज्य सरकार कटिबद्ध असून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत आहे. लाडली लक्ष्मी, गृह आधार आणि दयानंद सामाजिक सुरक्षा योजना यासारख्या काहींचा उल्लेख करावा लागेल. या व्यतिरिक्त सरकार आपल्या विविध विभागांमार्फत केंद्र पुरस्कृत योजना देखील राबवत आहे. या विस्तृत योजना/कार्यक्रमांमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्वला योजना, पोषण अभियान, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण आणि शहरी), जल जीवन मिशन आणि अमृत, प्रधानमंत्री स्वानिधी योजना, एक देश एक रेशन कार्ड, आयुष्मान भारत पीएम अन्न आरोग्य योजना, आयुष्मान भारत आरोग्य आणि कल्याण केंद्रे आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना, या योजनांचा यात समावेश आहे.
राज्यातील लोक त्यांच्या जीवनमानात सुधारणा करण्याच्या उद्देशाने, कार्यान्वित केलेल्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यास व सरकारच्या प्रयत्नांना सहकार्य करायला पुढे आल्यास या दिशेने सरकारचे प्रयत्न निश्चितच अपेक्षित आणि फलदायी परिणाम देतील.
– श्री. प्रकाश एस. नाईक, माहिती अधिकारी