गोवा खबर:मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात स्टार्ट-अपला चालना देण्यासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. माहिती आणि तंत्रज्ञान आणि पर्यटन खात्यातर्फे गोवा बीच व्हिजिल अॅप लॉन्च, नोंदणीकृत स्टार्टअप्सना प्रमाणपत्रांचे वितरण आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी पर्वरीतील सचिवालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांनी राज्याची अर्थव्यवस्था वाढविण्यात स्टार्ट-अप्सचा मोठा वाटा आहे त्यामुळे स्टार्ट-अपला पूर्ण उत्साहाने चालना देण्यासाठी सर्व संबंधितांनी सामूहिक जबाबदारी घेणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण करून तरुणांना स्टार्ट अपसाठी प्रोत्साहन देत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी शिकण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने अभियांत्रिकी अभ्यासक्रमांचे शुल्क कमी केले आहे. या उपक्रमामुळे राज्यात अधिकाधिक टेक्नोक्रॅट्स निर्माण होण्यास मदत होईल असे मुख्यमंत्री पुढे म्हणाले.

डॉ.सावंत यांनी गोवा बीच व्हिजिल अॅप शुभारंभ केला आणि स्वच्छ आणि सुरक्षित पर्यटनासाठी सर्वसमावेशक अॅप तयार करण्यासाठी गोवा इलेक्ट्रॉनिक लिमिटेडच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.
माहिती तंत्रज्ञान आणि पर्यटन मंत्री श्री.रोहन खवंटे यांनी आपल्या भाषणात राज्यातील नवीन स्टार्ट अप्स तसेच नवीन उद्योगांसाठी चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार अत्यंत गंभीर असल्याचे सांगितले. नवीन स्टार्ट-अप आणि इतर गुंतवणुकीसाठी गोव्यात स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी आणि इकोसिस्टम सुधारण्यासाठी सरकार इतर राज्यांमध्ये प्रचलित असलेल्या सर्वोत्तम पद्धतींचे पालन करील असे ते म्हणाले. स्टार्टअप हे महसूल आणि रोजगार निर्मितीचे नवीन माध्यम बनले आहे असेही ते म्हणाले.
याप्रसंगी काही स्टार्ट अप्सना स्टार्ट अप पॉलिसी अंतर्गत आर्थिक मदत वितरीत करण्यात आली आणि नोंदणीकृत स्टार्टअपसाठी प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली.
गोव्यातील समुद्रकिना-यावर नोंदविलेल्या कोणत्याही गुन्ह्यांचा अहवाल आणि प्रतिसाद देण्यासाठी आणि निराकरण करण्यासाठी पर्यटन खात्याने बीच व्हिजिल मोबाइल अॅप सुरू केले आहे. सुरुवातीच्या टप्प्यात अॅप पर्यटन खाते, गोवा पोलीस, दृष्टी, शॅक मालकांना आणले जाईल आणि पुढील टप्प्यात नागरिकांना ते डाउनलोड करण्यासाठी आणि गुन्ह्यांची तक्रार करण्यासाठी उपलब्ध असेल.
पर्यटन संचालक श्री. निखिल देसाई आयएएस, एमडी, इन्फो टेक कॉर्पोरेशन ऑफ गोवा श्री. विवेक एचपी, आयएएस यांची भाषणे झाली. यावेळी जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ.गणेश गावकर, मुख्य सचिव श्री.पुनीत कुमार गोयल आयएएस, पर्यटन सचिव श्री.रवी धवन आयएएस, माहिती व तंत्रज्ञान संचालक श्री.प्रवीण वोलवोतकर उपस्थित होते.