गोवा खबर: गोव्यातील शुगर बनारसे (१६) आणि सोफिया शर्मा (१४) या दोघींनी नुकत्याच पार पडलेल्या “इंडियन ओपन ऑफ सर्फिंग” स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धा
मंगळुरूजवळील पानंबूर समुद्रकिनाऱ्यावर पार पडल्या. सर्फिंग फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि मंत्रा सर्फ क्लब यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या या तीन दिवसीय कार्यक्रमात देशभरातील सुमारे १०० सर्फर सहभागी झाले होते. गोव्यातील मुली उत्तर गोव्यातील मोरजी येथील ‘ऑक्टोपस सर्फ स्कुल’चे संस्थापक आणि संचालक प्रशिक्षक एडी रॉड्रिग्स यांच्या विद्यार्थिनी आहेत.

ऑक्टोपस सर्फ स्कूलने गुरुवारी दुपारी पणजीमध्ये जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की शुगर बनारसेने महिलांच्या खुल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला, तर सोफिया शर्माने १६ वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला.
याबाबत प्रशिक्षक एडी रॉड्रिग्स म्हणाले की, “हे विजय अतिशय महत्त्वाचे आहेत कारण ही सोफियाची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आहे तसेच शुगरसाठी हा दुसरा मोठा राष्ट्रीय स्तरावरील विजय आहे. या पदकांमुळे गोव्याला भारताच्या सर्फिंग नकाशावर आणले आहे . यामुळे अधिकाधिक मुलींना सर्फिंगसाठी प्रोत्साहन मिळेल. ही स्पर्धा विशेष होती, कारण संपूर्ण भारतातून सर्वोत्कृष्ट सर्फर्स या स्पर्धेत सहभागी झाले होते.

महिलांच्या खुल्या गटात गोव्याच्या शुगरने सुवर्ण, तामिळनाडूच्या सृष्टी सेल्वमने रौप्य आणि कर्नाटकच्या सिंचना गौडा हिने कांस्यपदक जिंकले. दरम्यान, पुरुषांच्या खुल्या सर्फिंग प्रकारात कर्नाटकच्या रमेश बुधियालने तामिळनाडूच्या अजेश अलीला पराभूत करून सुवर्णपदकावर मिळवले. तर सतीश सरवणनला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
या राष्ट्रीय स्पर्धेत तामिळनाडूच्या सर्फर्सने सहा पदके जिंकून वर्चस्व गाजवले, कर्नाटक पाच पदकांसह दुसरे तर गोवा दोन सुवर्ण पदकांसह तिसरे स्थान मिळवले.