गोवा खबर:युवा अभिनेता आलोक राजवाडे यांचा मराठी लघुपट ‘गोष्ट अभि-अनुची’ तरुण जोडप्यातील विसंवाद आणि त्याचा त्यांचा मनावरचा प्रचंड ताण यावर बोलणारा सिनेमा आहे. नात्यात विसंवाद निर्माण झाला असेल, तर तोही संवाद साधून सोडवला जाऊ शकतो,हा संदेश हा छोटासा लघुपट आपल्याला देतो.
मुंबईत सुरु असलेल्या सतराव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या राष्ट्रीय स्पर्धा विभागात हा लघुपट दाखवला गेला. केवळ सतरा मिनिटांचा हा सिनेमा अभि आणि अनु या दोघांच्या नात्यात निर्माण झालेला तणाव आपल्यापर्यंत पोहोचवतो.लग्न झाल्यावर सगळं काही नीट, सुरळीत सुरु आहे, असं वाटत असतांना, जोडप्यात अनेकदा छोट्या-छोट्या गोष्टींवरुन भांडणे व्हायला लागतात, त्यातून ताण तणाव निर्माण होतो आणि दुरावा वाढतच जातो. त्यात सिनेमाकक्षेत्रात असलेल्या या सेलेब्रिटी जोडप्याकडे लोकही वेगळ्या नजरेने, आदर्श जोडपं म्हणून बघत असतात. आतून मात्र ते एकमेकांपासून वेगळे होण्याइतके दूर गेले असतात.आपल्यामध्ये नेमकं काय बिनसलं आहे, हेच त्या दोघांना कळत नाही, त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, सतत टोचून बोलणं, ओरबाडणे असे अधिकच घायाळ करणारे प्रकार हा दुरावा अधिकच वाढवतात. वेगळे होणे ही गोष्टच त्यांना पचवता येत नसते, घरच्यासमोर, लोकांसमोर एक आदर्श जोडपे अशी इमेज असतांना, ते मात्र आत या तणावातून जात असतात
हा त्रास असह्य झाल्यामुळे त्यांना समुपदेशकाकडे जावं असं वाटतं. आणि तिथे किमान त्यांच्यात थोडा सुसंवाद पुन्हा होऊ शकेल असा मार्ग त्यांना दिसायला लागतो. समुपदेशन, मानसोपचार म्हणजे काही चुकीचं नाही, तर पाण्यात गटांगळ्या खाणाऱ्याला किमान हातपाय मारुन पोहता येईल, एवढं शिकवणं, हेच आहे, असा छानसा संवाद ह्या लघुपटात आहे, एकदा आपलं आपल्याला पोहता यायला लागलं की हा आधार सोडून देता येईल. मात्र, जर वेगळं व्हायचं ठरवलंच असेल तर एकमेकांना जखमी कशाला करायचं? असं समुपदेशक त्यांना समजवतात. अभि-अनुलाही ते पटतं, कुठेतरी त्यांच्या मनाच्या आत ते पोहोचलेलं आहे, हे महत्वाचं.

आपण इतरांशी, आपल्या जवळच्या, ज्यांच्यावर आपलं खूप प्रेम आहे, अशा लोकांशी भांडत असतो, त्यांचे दोष दाखवण्यासाठी आपली जीभ बरीच शस्त्र शोधत असते. मात्र, इतरांशी भांडतांना, आपण स्वतः एक व्यक्ती म्हणून आतून तुटलेले, विस्कटलेले असतो. आपण इतरांना दोष देतो, मात्र, स्वतःला सांधण्याचा, शोधण्याचा प्रयत्न करतो का? याचाही शोध या सिनेमात घेण्याचा प्रयत्न आलोक राजवाडे यांनी केला आहे. . विशेषतः आजची युवा पिढी आज अशा सगळ्या प्रश्नांचा सामना करते आहे, मात्र समुपदेशकाकडे जाणं त्यांना आवडत नाही, किंवा ह्या प्रश्नाचं आकलनच होत नाही, हा व्यापक प्रश्न यात मांडला आहे.
केवळ नातेसंबंधामधला दुरावा, तणाव दाखवणे एवढाच या लघुपटाचा हेतू नाही, तर, अशा तणावासाठी मानसोपचार, समुपदेशकांची मदत घ्यायला हवी, हे हा लघुपट अधोरेखित करतो. हरवलेल्या माणसांना स्वतःचा शोध घेण्याच मार्ग दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. आलोक राजवाडे यांनी याआधी ‘कासव’या उत्तम चित्रपटातून अशा हरवलेल्या, अंतर्बाह्य विस्कटलेल्या आणि नंतर सावरलेल्या तरुणाची व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारली होती. आता दिग्दर्शक म्हणून त्यांनी या लघुपटातून हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
“नवरा बायकोनं वेगळे होणे ही गोष्ट आपल्या समाजात आजही तेवढ्या मोकळेपणाने स्वीकारली जात नाही. त्यामुळे आधीच एकमेकांमधल्या तणावाचा सामना करत असलेल्या या जोडप्याला, समाजाच्या दृष्टीचा, त्यांच्या प्रश्नांचाही सामना करावा लागतो. अशा वेळी, समाजानेही थोडे परिपक्व होऊन, या सगळ्याचा समंजसपणे सामना करावा असा विचार हा लघुपट मांडतो.” असं आलोक राजवाडे यांनी सांगितलं
परिवर्तन ट्रस्टनं ह्या लघुपटाची निर्मिती केली आहे. तर कथा मैत्रेयी कुलकर्णी यांची आहे.