पणजी:पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी लाचखोरीच्या प्रकरणात आपल्याच मंत्र्याविरुद्ध केलेल्या कारवाईचे गोव्यातील आप नेत्यांनी स्वागत केले. गोव्यातील आप नेत्यांनी सांगितले की, लाच घेताना राज्य सरकारने आपल्याच मंत्र्याच्या विरोधात भूमिका घेणे ही ऐतिहासिक घटना आहे.
वाल्मिकी नाईक म्हणाले की, पक्षाची स्थापना भ्रष्टाचारविरोधी तत्त्वांवर झाल्याने असे कारवाई करणे हे केवळ ‘आप’ लाच शक्य आहे. इतर कोणत्याही पक्षाच्या सरकारमध्ये असे झाले असते तर लाचेचे पैसे वाटून घेण्यावर चर्चा झाली असती आणि त्यात सहभागी असलेल्या मंत्र्याला शिक्षा देखील झाली नसती.
नाईक म्हणाले की, ही दुसरी घटना आहे. यापूर्वी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत 2015 मध्ये सत्ता स्थापन केल्यानंतर लाच मागणाऱ्या स्वतःच्या मंत्र्यावर कारवाई केली होती.
आपचे मुख्य प्रवक्ते राजदीप नाईक म्हणाले, “जनतेला दिलेली आश्वासने आणि दिलेला वचन पाळणारा एकमेव पक्ष आहे. पंजाबात सरकार स्थापन केल्यानंतर दोन महिन्यांच्या आत, ‘आप’ने निवडणुकीपूर्वी दिलेले प्रत्येक वचन पूर्ण केले आहे. त्याशिवाय भ्रष्टाचारविरोधी सरकार स्थापन करणार असे वचन दिलेल्या ‘आप’ सरकारने भ्रष्टाचार करणाऱ्या आमदाराविरोधात कारवाई करून त्या दिशेने पहिले पाऊल उचलले आहे.
नाईक यांनी भाजपाने निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे भ्रष्टाचारविरोधी उपाययोजना करण्याचे भाजप सरकारला आवाहन केले. ते म्हणाले की, भाजपने भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते आश्वासन आतापर्यंत पूर्ण झाले नाही.
आपचे उपाध्यक्ष संदेश तेलेकर देसाई म्हणाले, “गोव्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात पसरला आहे. दक्षता विभागात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. विरोधी पक्ष जेव्हा भ्रष्टाचार उघड करतात तेव्हाच संबंधित अधिकारी प्रक्रिया सुरू करतात. मात्र, ‘आप’ने स्वतः च्या मंत्र्याविरोधात कारवाई करून मोठे जगासमोर उदाहरण प्रस्थापित केले आहे. केवळ आपकडेच अशा कृत्याच्या विरोधात योग्य ती कारवाई करण्याची क्षमता आहे.”