गोवा खबर:गोव्यातील पंचायतींच्या निवडणूका पावसात घेणे शक्य नसल्याने तो पर्यंत पंचायतींवर प्रशासक नेमला जाईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बुधवारी दिली. इतर मागासवर्गीय आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या ट्रिपल टेस्टची पूर्तता न झाल्याने सरकारने हा निर्णय घेतला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.
पावसाळा तोंडावर असल्याने राज्यात पंचायत निवडणूक घेणे शक्य नाही. त्यामूळे राज्यातील निवडणूका पावसाळ्यानंतर घेण्यात याव्यात असा प्रस्ताव सरकारने निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे.
गोव्यात 186 पंचायती आहेत. या सर्व पंचायतींवर हा निर्णय लागू असणार आहे.सर्व पंचायतींचा 19 जून रोजी कालावधी संपल्याने हा निर्णय घ्यावा लागला आहे. मुख्यमंत्री याबाबत म्हणतात की सरकारने तिहेरी चाचणी घेण्यात यावी आणि अहवाल सादर करावा अशी शिफारस करणारी फाइल निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे.
सुरुवातीला 4 जून ही तारीख पंचायत निवडणुकीसाठी निश्चित केली होती. त्यानंतर ती 12 जून करण्यात आली. पण आता आरक्षणाच्या प्रकरणामुळे ही निवडणूक 12 जूनला होणे शक्य नाही. ही निवडणूक पावसाळ्या नंतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसे झाल्यास 20 जूनपासून सर्व 186 पंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात येईल. 19 जून हा विद्यमान पंचायतींचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्या दिवशी सर्व पंचायतीतल्या प्रतिनिधींचा काळ संपुष्टात येईल आणि ग्रामस्थांना कामांकरिता प्रशासकांवर अवलंबून राहावे लागेल.