Connect with us

गोवा खबर

दाबोळी इथे एअरोफ्लोट विमानाच्या आगमनाने झाला गोव्याच्या आंतरराष्ट्रीय चार्टर पर्यटन हंगामाचा प्रारंभ

Published

on

Spread the love


गोव्याच्या पारंपरिक आदरातिथ्याने हंगामातील पहिल्या चार्टर विमानाचे स्वागत; रशियन पर्यटकांच्या आगमनामुळे राज्याच्या पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा.

Posted On: 30 SEP 2026 4:32PM by PIB Mumbai

गोवा खबर:गोव्यातील दाबोळी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘एरोफ्लोट’च्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चार्टर विमानाचे बुधवारी, 30 सप्टेंबर 2026 रोजी आगमन झाले आणि गोव्याच्या 2026-27  या वर्षातील आंतरराष्ट्रीय चार्टर पर्यटन हंगामाची आश्वासक  सुरुवात झाली.

या पहिल्या चार्टर विमानाचे स्वागत गोव्याच्या पारंपरिक आदरातिथ्याने करण्यात आले. यात गोवन संगीताचा कार्यक्रम, स्वागताला गुलाबाच्या पाकळ्यांची उधळण आणि केक कापण्याचा समारंभ यांचा समावेश होता. गोव्याचे राजशिष्टाचार, आदरातिथ्य  आणि विधिमंडळ कामकाज मंत्री माविन गुदिन्हो यांनी विमानतळ संचालक  फ्लाइट लेफ्टनंट आकाश दीप, तसेच भारतीय विमानतळ प्राधिकरणचे प्रतिनिधी आणि विमानतळाशी संबंधित इतर घटक यांसह आगमन झालेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे स्वागत केले.

याप्रसंगी बोलताना गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे  संचालक, फ्लाईट लेफ्टनंट आकाश दीप म्हणाले की, दाबोळी विमानतळावर प्रथमदर्शनीच गोव्याचा जिव्हाळा, संस्कृती आणि आदरातिथ्य यांचे प्रतिबिंब दिसते. या हंगामातील ‘एरोफ्लोट’च्या पहिल्या चार्टर विमानाने आलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे स्वागत करताना आनंद झाल्याची  भावना त्यांनी व्यक्त केली.

चार्टर हंगाम सुरू झाल्यामुळे, आंतरराष्ट्रीय प्रवासी वाहतुकीत होणारी  वाढ अपेक्षित धरून त्याच्या हातळणीसाठी विमानतळाने आवश्यक व्यवस्था केली आहे. येणाऱ्या प्रवाशांना जलद आणि सुलभ अनुभव मिळावा यासाठी समर्पित इमिग्रेशन काउंटर्स अधिक सक्षम करण्यात आले आहेत, सीमाशुल्क मंजूरी अर्थात कस्टम्स क्लिअरन्स प्रक्रिया सुव्यवस्थित करण्यात आली आहे आणि ग्राउंड सपोर्ट सेवा वाढवण्यात आल्या आहेत. कार्यक्षम सेवा प्रदान करण्यासाठी आणि प्रवाशांची सोय  सुनिश्चित करण्यासाठी विमानतळाच्या वचनबद्धतेचाही आकाश दीप यांनी पुनरुच्चार केला.

चार्टर विमान सेवांच्या सुरुवातीमुळे नवीन पर्यटन हंगामाचा  एक महत्वपूर्ण प्रारंभ झाला असून, यामुळे गोव्याची आंतरराष्ट्रीय पर्यटन संपर्क-व्यवस्था अधिक बळकट होईल अशी अपेक्षा आहे.

संबंधित नागरी उड्डाण प्राधिकरणे, विमान कंपन्या आणि जमिनीवरील व्यवस्था हाताळणाऱ्या (ग्राउंड हँडलिंग) संस्था यांच्यासोबत ‘भारतीय विमानतळ प्राधिकरणा’ने ठेवलेला सातत्यपूर्ण समन्वय आणि प्रयत्नांमुळे ‘एरोफ्लोट’च्या चार्टर सेवा पुन्हा सुरू करणे शक्य झाले आहे.

दाबोळी  येथे आंतरराष्ट्रीय चार्टर विमानांच्या आगमनासाठी आवश्यक कार्यान्वित पायाभूत सुविधांची उपलब्धता, कार्यक्षम ग्राउंड हँडलिंग आणि प्रवाशांची सुरळीत ये-जा सुनिश्चित करण्यासाठी ‘भारतीय विमानतळ प्राधिकारणाने विशेष प्रयत्न हाती घेतले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून गोव्याला भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांमध्ये रशियन पर्यटकांचा मोठा आणि महत्वाचा वाटा आहे. ‘एरोफ्लोट’ची चार्टर सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे पर्यटन क्षेत्राला नवी चालना मिळण्याची अपेक्षा आहे; उत्तर तसेच दक्षिण गोव्यातील हॉटेल्स आणि बीच रिसॉर्ट्स, स्थानिक वाहतूक सेवा पुरवठादार, रेस्टॉरंट्स तसेच पर्यटनाशी संबंधित इतर व्यवसायांना याचा लाभ होईल.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाद्वारे संचालित दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ, गोवा राज्याला प्रमुख देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्थळांशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. भारतीय विमानतळ प्राधिकरण विमानतळाच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण करणे, प्रवाशांच्या सोयीसुविधा वाढवणे आणि गोव्यातील नागरी विमान वाहतूक व पर्यटन क्षेत्रांच्या वाढीस पाठिंबा देण्यावर सातत्याने लक्ष केंद्रित करत आहे.