गोवा खबर:ताळगाव मतदारसंघाच्या सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या आणि माजी कॅबिनेट मंत्री जेनिफर मोन्सेरात यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही वर्षांपासून त्या कॅन्सरशी झुंज देत होत्या. मुंबईतील रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांना डोना पाऊला येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जेनिफर मोन्सेरात २०१२ पासून सलग तीन वेळा ताळगाव मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी प्रमोद सावंत सरकारमध्ये मंत्री म्हणूनही काम पाहिले होते. त्यांचे पती बाबूश मोन्सेरात हे पणजी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, तर त्यांचा मुलगा रोहित मोन्सेरात हा पणजीचा महापौर आहे.
राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली
जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनाचे वृत्त समजताच गोव्यात सर्वपक्षीय नेते आणि जनतेकडून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत: “ताळगावच्या आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री श्रीमती जेनिफर मोन्सेरात यांच्या निधनाने अत्यंत दुःख झाले आहे. ताळगावच्या पहिल्या महिला आमदार आणि तीन टर्म आमदार म्हणून त्यांनी आपल्या मतदारसंघातील लोकांची आणि गोव्याची अत्यंत समर्पित वृत्तीने व संवेदनशीलतेने सेवा केली. या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांना आणि असंख्य हितचिंतकांना माझ्या मनापासून संवेदना. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.”
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव: “माजी मंत्री आणि ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात यांच्या अकाली निधनाचे वृत्त समजून तीव्र दुःख झाले. त्यांचे पती आणि पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात तसेच त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो.”