गोवा खबर : गोव्यातील पर्यटन आणि हवाई वाहतूक क्षेत्राने गेल्या काही वर्षांत मोठी झेप घेतली आहे. जानेवारी २०२३ मध्ये सुरू झालेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे (मोपा) राज्यातील हवाई प्रवासी वाहतुकीला मोठी चालना मिळाली आहे.
अधिकृत अहवालानुसार, मोपा विमानतळाने अवघ्या तीन वर्षांत १ कोटी ४० लाख ९४ हजार ७२९ देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची हाताळणी केली आहे. मोपा विमानतळावरून सध्या २० देशांतर्गत आणि १२ आंतरराष्ट्रीय अशा एकूण ३२ गंतव्यस्थानांसाठी विमाने धावत आहेत. विमानतळाची क्षमता टप्प्याटप्प्याने वाढवली जात असून अंतिम टप्प्यात दरवर्षी ३.५ कोटी प्रवाशांची हाताळणी करण्याचे उद्दिष्ट आहे. २०२५ मध्ये दाबोळी आणि मोपा या दोन्ही विमानतळांवरून ९१ चार्टर उड्डाणांद्वारे थेट परदेशी पर्यटक गोव्यात आले. या वाढत्या प्रवासी संख्येमुळे राज्याच्या महसुलातही मोठी भर पडत असून, डिसेंबर २०२४ पासून डिसेंबर २०२५ पर्यंत महसूल वाट्यापोटी राज्य सरकारला ११४.४९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.