Connect with us

गोवा खबर

अनंत चतुर्दशीपासून ‘ऑपरेशन विजय’ मोहीम : सरदेसाई

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्यात आगामी अनंत चतुर्दशीपासून ‘ऑपरेशन विजय’ या राज्यव्यापी मोहिमेची घोषणा केली. २०२७ ची विधानसभा निवडणूक ही गोव्याची अस्मिता आणि अस्तित्व वाचविण्याची शेवटची लढाई असल्याचे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.

यावेळी त्यांनी सत्ताधारी भाजपसह कारभारसह काँग्रेसवरही निशाणा साधला. फातोर्डा येथे झालेल्या वाढदिवस मेळाव्यात सरदेसाई म्हणाले की, राज्यावरील कर्ज १५ हजार कोटी रुपयांच्या पुढे गेले असून सरकार केवळ लुटीचे राजकारण करण्यात व्यस्त आहे. सरकारी नोकऱ्यांची विक्री, कोटींचे घोटाळे आणि गोमंतकीयांच्या हिताविरुद्ध निर्णयामुळे राज्याची हानी होत असल्याचा दावा त्यांनी केला.

यावेळी फा. व्हिक्टर फेरांव, पंजाबचे माजी आमदार जीत मोहिंदर सिंग यांनीही मनोगत व्यक्त केले. फा. व्हिक्टर फेरांव यांनी गोव्यात विजयाच्या रूपाने कायमस्वरूपी क्रांती होण्याची गरज व्यक्त केली. विजय सरदेसाई यांच्यात ती क्षमता असून त्यांनी पेडणे ते काणकोण अशी विजय यात्रा काढावी, असे ते म्हणाले.

पंजाबचे माजी आमदार जीत मोहिंदर सिंग यांनी सरदेसाई हे नेहमी लोकांच्या संपर्कात राहणारे नेते असल्याचे सांगितले. त्यांनी केवळ फातोर्डा मतदारसंघापुरते मर्यादित न राहता संपूर्ण गोव्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी दीपक कळंगुटकर, महाराष्ट्राचे माजी आमदार अनिल कदम, गोवा फॉरवर्ड पक्षाचे मुख्य प्रवक्ते प्रशांत नाईक, फा. आल्बन फर्नांडिस यांनीही मनोगत व्यक्त केले.

मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसवर निशाणा साधताना सरदेसाई म्हणाले की, विरोधक आपली भूमिका प्रभावीपणे बजावत नसल्यामुळे जनतेला रस्त्यावर उतरावे लागत आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर आपण गोवा फॉरवर्ड पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा तसेच विरोधी पक्षनेतेपद स्वीकारण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र काँग्रेस हायकमांडकडून त्याला तसेच विरोधी ऐक्यासाठी प्रतिसाद मिळाला नाही. विरोधी ऐक्यासाठी आम्ही अद्यापही तयार आहोत; मात्र स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. गरज पडल्यास ‘एकला चलो रे’ची भूमिकाही स्वीकारू, असे संकेत त्यांनी दिले.

आगामी निवडणूक ही केवळ सत्तेबदलाची लढाई नसून गोव्याच्या भवितव्याशी संबंधित असल्याचे ते म्हणाले. गोयंकारपणाचे सरकार स्थापन करण्याची वेळ आली असून सध्या राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणारे आणि मतांचे ध्रुवीकरण करून निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न करणारे राजकारण सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली.

या कार्यक्रमात सरदेसाई यांनी दावा केला की, यापूर्वी गोवा फॉरवर्ड पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण अथवा स्वतः काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र काँग्रेसचे नेते मायकल लोबो यांनी त्याला विरोध दर्शविला. उत्तर आणि दक्षिण गोव्यातील नेतृत्त्वाच्या प्रश्नावरून मतभेद निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

दक्षिण गोव्यातील नेत्याला विरोधी पक्षनेतेपद दिल्यास उत्तर गोव्यासाठी काही अटी मांडण्यात आल्या होत्या. या राजकीय पेचप्रसंगामुळेच काँग्रेस प्रवेशाचा विषय पुढे सरकला नाही, असा दावा सरदेसाई यांनी केला.