Connect with us

गोवा खबर

महिला आणि बाल विकास मंत्रालयामार्फत 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत पाळण्यात येणार जागतिक स्तनपान सप्ताह

Published

on

Spread the love


‘अधिक निरोगी भारतासाठी स्तनपान’ याविषयी कुटुंबे, समुदाय आणि आरोग्य सेवा पुरवठादार यांच्यात जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट

गोवा खबर : भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत संपूर्ण देशभर 1 ते 7 ऑगस्ट 2026 हा कालावधी ‘जागतिक स्तनपान सप्ताह’ म्हणून पाळला जाणार आहे. ‘आयुष्याच्या शाश्वत सुरुवातीसाठी स्तनपान: प्रभावी उपायांचे बळकटीकरण’ (ब्रेस्टफीडिंग फॉर अ सस्टेनेबल स्टार्ट इन लाईफ: स्ट्रेंदन व्हॉट वर्क्स) अशी या वर्षीच्या या सप्ताहाची संकल्पना आहे. आठवडाभर चालणाऱ्या या मोहिमेद्वारे कुटुंबे, समुदाय आणि आरोग्य सेवा पुरवठादार यांच्यात: बाळाच्या जन्मानंतर त्याला लवकरात लवकर स्तनपान सुरू करणे, पहिले सहा महिने त्याला केवळ स्तनपान देणे त्यानंतर दोन वर्षांपर्यंत बाळाला योग्य पूरक आहारासोबतच स्तनपान सुरू ठेवणे या बाबींविषयी जागृती निर्माण केली जाईल.

बालकांचे जगणे, त्यांची निकोप वाढ आणि बौद्धिक विकास यांसाठी स्तनपान हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. प्रत्येक नवजात बालकाला जन्मानंतर- ज्याला ‘गोल्डन अवर’ असे म्हटले जाते, त्या पहिल्या तासात — आईचे दूध मिळेल, याची काळजी घ्यावी असे आवाहन मंत्रालयाद्वारे कुटुंबांना केले आहे. बाळाच्या जन्मानंतरचे आईचे पहिले दूध, म्हणजेच ‘चीक’ (कोलोस्ट्रम) अँटीबॉडीज आणि आवश्यक पोषक घटकांनी समृद्ध असल्याने ते बाळासाठी पहिली नैसर्गिक लस असल्याचे मानले जाते; त्यामुळे ते अजिबात काढून टाकले जाऊ नये.

पहिल्या सहा महिन्यांत बाळाला फक्त स्तनपानावर ठेवणे म्हणजे पाणी, मध, गुटी, ग्लुकोज किंवा फॉर्म्युला मिल्क यापैकी काही न देता फक्त आईचे दूध पाजणे होय. या काळात केवळ आईचे दूधच बाळाच्या पोषणाच्या आणि पाण्याच्या सर्व गरजा पूर्ण करते. सहा महिन्यांनंतर, त्यापुढील दोन वर्षांपर्यंतच्या काळात पूरक आहार सुरू करून बाळाला स्तनपान सुरू ठेवावे. मातांना जन्मानंतर बाळाबरोबर त्वचेचा संपर्क (स्किन-टू-स्किन कॉन्टॅक्ट) ठेवण्यास, वारंवार स्तनपान करण्यास आणि आवश्यकतेनुसार आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका किंवा आरोग्य सेवा प्रदात्यांकडून मार्गदर्शन घेण्यास प्रोत्साहन दिले जाते. नोकरी करणाऱ्या माता आपले दूध काढून त्यांची सुरक्षितपणे साठवण करता येऊ शकते. स्तनपान देणे मातांसाठीही फायद्याचे असते, त्यांना प्रसूतीनंतर आपले आरोग्य राखण्यास त्याची मदत होते तसेच स्तनाचा व अंडाशयाचा कर्करोग, टाईप-2 मधुमेह होण्याचा तसेच प्रसूतीनंतर नैराश्य येण्याचा धोका कमी होतो.

प्रत्येक मातेला स्तनपान देणे शक्य व्हावे आणि प्रत्येक मुलाच्या आयुष्याची उत्तम सुरुवात होण्यास पोषक वातावरण निर्माण करण्यास हातभार लावावा असे मंत्रालयाने आरोग्यसेवा व्यावसायिक, समुदाय कार्यकर्ते, कुटुंबे आणि नागरिकांना आवाहन केले आहे.