गोवा खबर : गोव्यातील आयआयटीच्या कायमस्वरूपी कॅम्पससाठी बांदोडा पंचायत क्षेत्रातील फर्मागुढीच्या जागेला केंद्र सरकारने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून जमीन तातडीने ‘आयआयटी, गोवा’च्या ताब्यात देण्याच्या सूचना राज्य सरकारला केल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाने गोवा तंत्रशिक्षण संचालनालयाला यासंबंधी पत्र पाठवून कळवले आहे.
केंद्रीय मंत्रालयाच्या साईट सिलेक्शन कमिटीने १९ मे रोजी जागेची पाहणी केली होती. २०१६ मध्ये आयआयटीची गोव्यात स्थापना झाल्यापासून या संस्थेचे कामकाज सध्या फर्मागुढी येथील गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसमधून सुरू आहे. यापूर्वी लोलयें, काणकोण आणि मेळावली (सत्तरी) येथे स्थानिकांच्या तीव्र विरोधामुळे हा प्रकल्प रेंगाळला होता, मात्र आता फर्मागुढीची जागा निश्चित झाल्याने प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.