Connect with us

गोवा खबर

वाढीव वीजबिलांविरोधात उद्रेक; हणजूण-शिवोली ग्रामस्थांचा वीज खात्यावर धडक मोर्चा

Published

on

Spread the love

गोवा खबर : गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त वीजबिले आल्याचा आरोप करत हणजूण आणि शिवोली येथील रहिवाशांनी पणजी येथील विद्युत भवनावर धडक देऊन मुख्य अभियंत्यांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन केले.

आंदोलकांनी मुख्य वीज अभियंते स्टिफन फर्नांडिस व इतर अधिकाऱ्यांना घेराव घालत त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली. या आंदोलनाला काँग्रेसचे नेते ॲड. अमित पालेकर, आम आदमी पक्षाचे गोवा अध्यक्ष वाल्मिकी नायक, योगेश गोवेकर, गजानन तिळवे आणि अनेक नागरिकांनी पाठिंबा दिला. मुख्य अभियंत्यांनी स्पष्टीकरण दिले की, मंजूर भारापेक्षा अधिक वीज वापरणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक शुल्क आकारल्याने बिलात वाढ झाली आहे. त्यांनी ग्राहकांना अतिरिक्त शुल्क टाळण्यासाठी मंजूर भार वाढवण्याचा सल्ला दिला.

काँग्रेस नेते अमित पालेकर यांनी या प्रकाराला वीज खात्याकडून झालेली सर्वसामान्यांची लूट म्हटले असून दंडात्मक शुल्क रद्द करण्याची मागणी केली आहे, तर वाल्मिकी नायक यांनी भाजप सरकार केवळ सर्वसामान्यांना लुटण्याचे काम करत असल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, हणजूण, वागातोर आणि शिवोली परिसरात नवीन भूमिगत वीजवाहिन्या जोडण्याचे काम वेगाने सुरू असून, ऑगस्ट महिन्यात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आमदार मायकल लोबो यांनी दिली आहे.