गोवा खबर : पणजीचे पहिले महापौर अशोक मोगू नाईक यांच्या ७९ व्या वर्षात पदार्पणाच्या निमित्ताने ‘अशोक नाईक सत्कार समिती’ आणि ‘इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा’ यांच्या संयुक्त विद्यमाने एका सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते अशोक नाईक यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला, तसेच त्यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘अंधारातून प्रकाशाकडे नेणारी माझी जीवनयात्रा’ या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.
श्रीपाद नाईक यांनी आपल्या भाषणात सांगितले की, अशोक नाईक यांचा सत्कार करणे म्हणजे त्यांच्या साधेपणा, प्रामाणिकपणा आणि आयुष्यभर जपलेल्या समाजसेवेच्या मूल्यांचा गौरव करण्यासारखे आहे.
या सोहळ्याला उद्योजिका ज्योती बांदेकर, प्रदीप तळावलीकर, अश्विनी नाईक आणि त्यांचे बालपणीचे मित्र प्रा. सुभाष वेलिंगकर उपस्थित होते. अशोक नाईक यांनी आपल्या मनोगतात जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, त्यांनी महापौरपदाच्या कार्यकाळात कधीही वैयक्तिक फायद्याचा विचार केला नाही आणि मनोहर पर्रीकरांना निवडून आणण्यासाठी व भाजपच्या उभारणीसाठी योगदान दिले. मात्र, नंतरच्या काळात पक्षाची वाटचाल वेगळ्या दिशेने जाऊ लागल्याने आणि ती आपल्या तत्त्वांशी सुसंगत नसल्याने त्यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला होता. प्रा. वेलिंगकर यांनीही त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करताना नमूद केले की, राजकीय पडझड आणि आर्थिक अडचणी असूनही अशोक नाईक यांनी कधीही राजकारणाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला नाही आणि ते नेहमीच तत्त्वाशी बांधील राहिले.