गोवा खबर : पेडणे मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास हा माझ्याच कार्यकाळात झाला असून, सध्याच्या काळात रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आगामी निवडणुकीत जनतेने मला पुन्हा एकदा संधी द्यावी, असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केले आहे.
इब्रामपूर येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या एका महत्त्वाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी सरपंच तुळशीदास गावस, राजाराम गावस, कामिल फर्नांडिस, सुभाष सावंत, माजी सरपंच मंदार परब यांच्यासह अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
आजगावकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पेडणे मतदारसंघात वीज, रस्ते आणि पाणी यांसारख्या मूलभूत सुविधा अपुऱ्या असताना पेडणेकरांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला चार वेळा विधानसभेत पाठवले आणि मी देखील त्या विश्वासाला सार्थ ठरवत स्थानिक प्रश्न मार्गी लावले. निवडणुका जवळ आल्या की काही इच्छुक उमेदवार केवळ आश्वासने देतात आणि स्वतःला भूमीपुत्र म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करतात, मात्र जनता सुज्ञ असून ती प्रत्यक्ष काम करणाऱ्या पाठीशी उभी राहते, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. मागील निवडणुकीत पक्षाने त्यांना मडगाव मतदारसंघातून उमेदवारी दिल्यामुळे पेडणेच्या विकासाला अपेक्षित दिशा मिळाली नाही, अशी टीकाही यावेळी करण्यात आली. या बैठकीत उपस्थितांनी बाबू आजगावकर यांच्या उमेदवारीला पूर्ण पाठिंबा जाहीर केला.