Connect with us

गोवा खबर

स्वतःच्या पेन्शनमधून वाड्याची तहान भागवणारे काणकोणचे बाळकृष्ण अय्या; ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधानांकडून कौतुक

Published

on

Spread the love

गोवा खबर : कोट्यवधी रुपयांचे बजेट असूनही जिथे सरकारी यंत्रणा पाणी पुरवण्यात अपयशी ठरतात, तिथे काणकोणमधील एका ७७ वर्षीय निवृत्त शिक्षकाने स्वतःच्या कष्टाच्या पैशातून अख्ख्या वाड्याची तहान भागवून एक भगीरथ चमत्कार घडवला आहे. काणकोण येथील माशितळप वाड्यावर गेल्या तीन दशकांपासून लोकवस्ती वाढली, मात्र उन्हाळ्यात विहिरी आटत असल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासने मिळत राहिली. अशा कठीण परिस्थितीत निवृत्त शिक्षक आणि अष्टपैलू कलाकार असलेल्या बाळकृष्ण अय्या यांच्यातील ‘ह्यूमन इनसाईट’ जागृत झाला आणि त्यांनी कोणतीही इंजिनिअरिंगची पदवी नसताना दोन दुर्गम विहिरींमधून पाणी उपसण्याची भन्नाट कल्पना लढवली.

त्यांनी खोल विहिरीच्या बाहेरून गोलाकार पायवाट तयार करून तिथे उच्च क्षमतेचे विद्युत पंप बसवले आणि जमिनीतून सुमारे १२00 मीटर लांबीची भूमिगत जलवाहिनी टाकण्याचे आव्हानात्मक काम एकहाती पूर्ण केले. सतत २४ वर्षे त्यांनी या माध्यमातून २५ हून अधिक कुटुंबांची तहान अविरतपणे भागवली असून, दोन वर्षांपूर्वी या भागात सरकारी नळ येईपर्यंत त्यांची ही सेवा अखंड सुरू होती. या संपूर्ण प्रकल्पासाठी त्यांनी निवृत्तीवेतन आणि मूर्तीकलेतून मिळालेले स्वतःच्या हक्काचे लाखो रुपये खर्च केले. त्यांच्या या निरपेक्ष आणि अचाट कार्याची थेट दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमात त्यांचा जाहीर गौरव केला. या कौतुकामुळे आपण पूर्णपणे श्रमपरीहार झाल्याचे बाळकृष्ण अय्या सांगतात. याशिवाय, त्यांनी माडाच्या चुडांपासून पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या झाडूंना आधुनिकतेची जोड देत कमीत कमी ‘धिर’ वापरून सुबक झाडू बनवण्याचा यशस्वी प्रयोग केला असून, तो शिकवण्यासाठी ते नेहमी मोफत तत्पर असतात.