पणजी : सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पत्नींनाही ‘गृह आधार’ योजनेचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकार सकारात्मक विचार करत असून लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. उसगाव येथील दिनेश गावडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली.
गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या दिनेश गावडे यांच्या घरी जाऊन मंत्री विश्वजीत राणे यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी त्यांनी गावडे यांच्या पत्नी व कुटुंबीयांशी संवाद साधत सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास दिला. गावडे यांच्या मुलीला सरकारी नोकरी देण्यात येईल तसेच तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
याशिवाय गावडे कुटुंबाला इतर आर्थिक मदत देखील देण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले. दिनेश गावडे यांच्या पत्नीला यापूर्वी ‘गृह आधार’ योजनेचा लाभ मिळत होता. मात्र गावडे कंत्राटी पद्धतीवर सरकारी सेवेत असल्याने त्यानंतर हा लाभ बंद झाला होता. अशा अनेक कुटुंबांवर अन्याय होत असल्याची बाब सरकारच्या निदर्शनास आली असून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पत्नींनाही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी सरकार गंभीरपणे विचार करत असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
गव्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. वन विभागाकडून गव्यांना जंगलात परत पाठवण्यासाठी आणि मानवी वस्त्यांमध्ये त्यांचा वावर रोखण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांनी गव्यांना चिथावणी देऊ नये तसेच त्यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
दिनेश गावडे यांच्या मृत्यूमुळे उसगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांनी वन विभागाने अधिक ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. मानवी वस्त्यांमध्ये गव्यांचा वाढता वावर गंभीर बाब असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे मतही स्थानिकांनी व्यक्त केले.
दरम्यान, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वन विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचे संकेत मंत्री विश्वजीत राणे यांनी दिले.