गोवा खबर : इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड (आयपीएससीडीएल) ने पणजी शहरात अनेक ठिकाणी सांडपाण्याचा अतिप्रवाह झाल्याच्या आरोपांबाबत आज राज्यातील काही प्रसिद्धिमाध्यमांद्वारे प्रसारित झालेल्या, दिशाभूल करणाऱ्या, चुकीच्या दाव्यांचे जोरदारपणे खंडन केले आहे.
नव्याने बांधलेल्या सांडपाणी नेटवर्कच्या साफसफाई आणि कार्यान्वित करण्याशी संबंधित कामे आयपीएससीडीएलद्वारे सध्या हाती घेण्यात आले आहे. या कामांमध्ये नवीन सांडपाणी वाहिन्या आणि मॅनहोलची साफसफाई समाविष्ट आहे, जी कोणतीही नवीन सांडपाणी प्रणाली कार्यान्वित करण्यापूर्वीची मानक, अनिवार्य आणि अपरिहार्य प्रक्रिया असते. ही कामे कोणत्याही प्रकारची बिघाड, अपयश किंवा सांडपाण्याचा अतिप्रवाह दर्शवत नाहीत. याव्यतिरिक्त, आयपीएससीडीएल पणजी शहरात मुसळधार पावसाळ्याच्या परिस्थितीत भूगर्भातील पाणी आत शिरू नये म्हणून नव्याने बांधलेल्या मॅनहोलचे वॉटर-टायटनिंग करत आहे. मात्र, प्रसिद्धिमाध्यमांद्वारे याबाबत चुकीच्या पद्धतीने वृत्तांकन किंवा सादरीकरण केले गेले आहे.

याबाबत आयपीएससीडीएलचे चेअरमन आणि सरव्यवस्थापक एदुआर्दो परेरा यांनी स्पष्ट केले की, पणजी शहरामध्ये सांडपाण्याच्या अतिप्रवाहाचे कोणतेही संकट नाही. तसेच सांडपाणी यंत्रणा साफसफाई व कार्यान्वयन प्रक्रियेतील कामांमुळे शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा सुविधेला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. ही सर्व कामे स्थापित अभियांत्रिकी मानके आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करून, पद्धतशीर, नियंत्रित आणि तांत्रिक देखरेखीखाली केली जात आहेत.
माध्यमांनी प्रकाशित केलेल्या छायाचित्रामध्ये नव्याने बांधलेल्या मॅनहोलमधून पाणी उपसण्याची आणि साफसफाईची कामे स्पष्टपणे दिसत आहेत. याबाबत खोटा दावा केला गेला असून सार्वजनिक रस्त्यांवर सांडपाणी वाहत असल्याचे कोणत्याही प्रकारे दिसत नाही. हे देखील स्पष्ट करण्यात येते की, सांतिनेझ येथील नवीन सांडपाणी वाहिनी अद्याप कार्यान्वित केलेली नाही. त्यामुळे, कार्यान्वित न झालेल्या सांडपाणी वाहिनीतून सांडपाण्याचा अतिप्रवाह होत असल्याचा कोणताही दावा तांत्रिकदृष्ट्या चुकीचा, दिशाभूल करणारा आणि बेजबाबदार आहे.
वृत्तांकन करणाऱ्या प्रतिनिधींनी याबाबत योग्य माहिती व स्थिती समजून घेत वृत्तांकन करावे आणि यासाठी सदर कामे करणाऱ्या अधिकृत संस्थांच्या जबाबदार अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन आयपीएसडीएलद्वारे करण्यात आले आहे.