गोवा खबर : गोवा सरकारचा दिव्यांगजन सक्षमीकरण विभाग आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालय यांच्याद्वारे ७ जानेवारी रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिवसानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशन, गोवा येथे आयोजित या कार्यक्रमासाठी ‘जीवन सक्षमीकरण, हक्कांची सुनिश्चिती’ ही संकल्पना निश्चित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाला दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे मंत्री सुभाष फळदेसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव प्रसन्ना आचार्य, दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या संचालक वर्षा नाईक, राज्य दिव्यांगजन आयुक्तांचे सचिव ताहा हाजिक; आणि संजय सेंटर फॉर स्पेशल एज्युकेशनच्या सदस्य सचिव नीतल आमोणकर आदी मान्यवरांचीही या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होती.

याप्रसंगी, ओडिशामध्ये झालेल्या मुख्यमंत्री चषक स्पर्धेतील विजेता व्हीलचेअर क्रिकेट संघाचा सर्वसमावेशक खेळांमधील उत्कृष्ट कामगिरी आणि योगदानासाठी, माननीय मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दरवर्षी ३ डिसेंबर रोजी जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय दिव्यांगजन दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे औचित्य साधत, नियमित आणि विशेष शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोस्टर बनवणे, चित्रकला, प्रश्नमंजूषा स्पर्धा, दृश्यकला स्पर्धा आणि दृश्य कला सादरीकरण आदी उपक्रमांचा समावेश होता. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, जागरूकता आणि सर्वसमावेशकता वाढवणे हा होता.
कार्यक्रमादरम्यान स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली, त्यांच्या प्रतिभेचा गौरव करण्यात आला आणि दिव्यांग व्यक्तींसाठी समानता, सर्वसमावेशकता व सक्षमीकरणाचा संदेश अधिक दृढ करण्यात आला.