गोवा खबर : जवानांनी, क्रांतिकारांनी देशासाठी रक्त सांडले. बलिदान केले. जवानांचे जीवन किती खडतर आहे याचा अनुभव मी त्यांच्याची संवाद साधताना, भारतीय सेना प्रमुखांशी चर्चा करतांना घेतला आहे असे सांगून केंद्रीय नवीनीकरण ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी, जवानांचा त्याग, अढळ निर्धार लक्षात घेऊन आपण देशप्रेम सतत जागृत ठेवायला हवे. देशप्रेम आयुष्यभर जपण्याचे मूल्य आहे याची जाणीव करून दिली.
मंगेश गावकर असोसिइट्स तर्फे, जीवावर उदार होऊन देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञभाव ठेवून त्यांना सलामी देण्यासाठी, त्यांनी केलेल्या १२ सशस्त्र कारवायांवरील काढलेल्या ‘ रक्षा सुरक्षा’ दिनदर्शिकेचे (कॅलेंडर २०२६) सूर्यकिरण हेरिटेज हॉटेल मध्ये प्रकाशन केल्यानंतर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीपाद नाईक बोलत होते.
व्यासपीठावर सन्माननीय पाहुणे डेप्युटी सॉलिसिटर ऑफ इंडिया फॉर गोवा स्टेट प्रविण फळदेसाई, राज हाउसिंग चे मालक संदीप निगळे, बेतकी खांडोळा चे जिल्हा पंचायत सदस्य सुनील जल्मी भोमकर, मंगेश गावकर असोसिइट्स चे मंगेश गावकर उपस्थित होते.
श्रीपाद नाईक म्हणाले, जवानांच्या शौर्याला अर्पण केलेले हे कॅलेंडर समाजमनाला स्पर्श करणारे, प्रेरणा देणारे आहे. ते ऑपरेशन पराक्रम, ब्लॅक फॉरेस्ट, सिंदूर, मेघदूत, कारगिल, ब्ल्यू स्टार अशा १२ सशस्त्र कारवायांवर बेतलेले आहे. प्रविण फळदेसाई म्हणाले, पूर्वीप्रमाणे कॅलेंडर्स घरातील भिंतीवर लावून शोभा वाढविण्याची प्रथा मागे पडली आहे परंतु नवनवीन,समाजपयोगी विषय घेऊन, आपल्या संग्रही असावे असे कोणालाही वाटावे या पद्धतीने कॅलेंडर काढणे हा मंगेश गावकर यांचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. सैनिक जीवावर उदार होऊन देशाचे रक्षण करतात. या माध्यमातून नव्या पिढीला याची जाणीव होईल.
संदीप निगळे यांनी सांगितले की, सामाजिक आस्थेचे विषय वेगळ्या माध्यमातून समोर आणण्याचा हा उपक्रम अभिनंदनीय आहे. अत्यंत कठीण परिस्थितीत देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांना दिलेली ही सलामी आहे. सुनील भोमकर यांनी, व्यावसायपलिकडे जाऊन मंगेश गावकर सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात देत असलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला.अश्विनी अभ्यंकर, सुरभी व रियांशा यांनी गायिलेल्या देशभक्तीपर गीताने सोहळ्याला प्रारंभ झाला. मंगेश गावकर यांनी स्वागत केले व या उपक्रमामागील उद्देश सांगितला. विधाती गावकर यांनी कॅलेंडर विषयी माहिती दिली. डॉ. रश्मिना आमोणकर यांनी सूत्रसंचालन केले. अर्चना डिचोलकर यांनी आभार मानले. यावेळी कला अकादमीचे उपाध्यक्ष तथा स्वस्तिक चे अध्यक्ष यांचा तसेच सुरज डॉट कॉम च्या संचालिका टिना रेडकर यांचा सन्मान करण्यात आला.सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.