गोवा खबर : बेंगळुरू आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्रात (बीआयईसी) झालेल्या बेंगळुरू टेक समिट २०२५ च्या २८व्या आवृत्तीत गोवा पॅव्हिलियनला उत्तम प्रतिसाद मिळाला. तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात देश-विदेशातील पाहुणे, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी गोवा सरकारच्या माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन विभागाने (डीआयटीईएन्डसी) सादर केलेल्या डिजिटल उपक्रमांना, तंत्रज्ञान प्रकल्पांना आणि स्टार्टअप इकोसिस्टमला भेट दिली. गोवा पॅव्हिलियनला ५०० हून अधिक लोकांनी भेट दिली.
गोव्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये डॉ. मिलिंद साखरदांडे (संयुक्त संचालक, डीआयटीईएन्डसी), सुब्राई नाडकर्णी (मुख्य अभियंता, जीआयटीडीसी), सिद्धार्थ बोरकर (उपसंचालक, डीआयटीईएन्डसी), गौरव सावळ (सहाय्यक संचालक, डीआयटीईएन्डसी), आणि डी. एस. प्रशांत (मुख्य कार्यकारी अधिकारी, स्टार्टअप एन्ड आयटी प्रमोशन सेल) यांचा समावेश होता.
पॅव्हिलियनला यूके, रशिया, डेन्मार्क, कॅनडा आणि स्वीडनच्या प्रतिनिधींसह आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगला प्रतिसाद मिळाला. विशेषतः डेन्मार्कचे कन्स्युलेट जनरल जोएल स्टॅफर्ड यांनी गोव्याच्या डिजिटल कार्यक्रमांची, पायाभूत सुविधांची आणि वाढत्या नवकल्पनांची माहिती घेतली.
जागतिक उद्योगक्षेत्रातील अनेक मोठ्या कंपन्यांनी भविष्यातील गुंतवणुकीसाठी गोव्यात संधी असल्याचे सांगितले. नायनसिगमा चे युरोप-अमेरिका इनोव्हेशन आणि बिझनेस डेव्हलपमेंट डायरेक्टर निकोलास वोजनारोव्स्की म्हणाले,
“भारतामध्ये आम्ही अनेक शहरांमध्ये काम करतो, पण गोवा आमच्या आगामी प्रकल्पांसाठी एक उत्तम केंद्र ठरू शकते.”
राष्ट्रीय स्तरावरील उद्योग संस्था, महाविद्यालये आणि इकोसिस्टम पार्टनर्स – टीआयई बेंगळुरू, केएलई, ईएलसीआयए, आयडीएफसी इत्यादींनीही पॅव्हिलियनला भेट देऊन सहकार्याच्या संधींबाबत चर्चा केली.

ईएलसीआयटीए च्या मुख्य कार्यकारी अधिकारी रमा एन. एस. म्हणाल्या “एप्रिलमध्ये मी गोवा टीमला भेटले होते. त्यांनी गोव्याला इलेक्ट्रॉनिक्स सिटीसारखे विकसित करण्याचे मोठे स्वप्न दाखवले होते. आज त्यांच्या स्टॉलमध्ये पाहिले तेव्हा जाणवले की ते फक्त बोलत नाहीत, तर प्रत्यक्षात काम करत आहेत.”
इतर राज्यांमधील प्रतिनिधींनीही गोव्याच्या डिजिटल कनेक्टिव्हिटी, शासन प्रक्रिया, औद्योगिक प्रकल्प आणि क्रिएटिव्ह-टेक वातावरणाबद्दल माहिती घेतली. विशेष म्हणजे, तरुणांनी गोवा पॅव्हिलियनमध्ये सर्वाधिक सहभाग दाखवला, ज्यातून गोव्याच्या उदयास येणाऱ्या टेक आणि स्टार्टअप क्षेत्राबद्दल त्यांचा वाढता उत्साह दिसून आला.
गोव्यातील स्टार्टअप्स – स्पिन्टली आणि जेनोरा इन्फोटेक – यांनी आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन केले.
स्पिन्टलीचे सहसंस्थापक आणि सीटीओ माल्कम डिसपझा म्हणाले, येथे गोवा सरकारने स्टॉल उभारला ही खूप चांगली पुढाकार आहे. अशा प्लॅटफॉर्ममुळे जगभरातील लोकांपर्यंत पोहोचता येते आणि गोवा फक्त पर्यटन राज्य नसून एक तेजस्वी टेक इकोसिस्टमही आहे हे दाखवता येते.
जेनोरा इन्फोटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद प्रभू म्हणाले, गोवा डीआयटीईएन्डसी आणि स्टार्टअप एन्ड आयटी प्रमोशन सेल यांच्या उपक्रमांचे या समिटमध्ये उत्तम प्रदर्शन झाले. मला आमच्या नवीन वोक्सइन्टेल या राजकीय कॅम्पेन मॅनेजमेंट प्लॅटफॉर्मसह गोव्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली.
शेवटी, या समिटमधील नव्या जोडण्या आणि सहकार्यामुळे गोवा भारताचे क्रिएटिव्ह कॅपिटल आणि जलद गतीने वाढणारे टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन हब म्हणून अधिक मजबूत होत आहे.