गोवा खबर : दाबोळी विमानतळाच्या विस्तारीकरण कामाचा टप्पा पूर्ण होत असून, डिसेंबरमध्ये नवीन टर्मिनलसारख्या सुविधांचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे, अशी माहिती नूतन संचालक फ्लाइट लेफ्टनंट आकाशदीप यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सध्या विमानतळाचे क्षेत्र ६५,६०० चौ.मी. आहे; विस्तारीकरणानंतर ते ८३,९०० चौ.मी. होणार आहे.
आकाशदीप म्हणाले की, सध्या टर्मिनलमध्ये एका वेळी ४,४५० प्रवाशी हाताळता येतात — (३,२६० देशांतर्गत व १,१९० आंतरराष्ट्रीय). विस्तारानंतर क्षमता वाढून ५,१५० प्रवाशी करण्याचे उद्दिष्ट आहे. ‘चेक-इन काउंटर’ ६४ वरून ९६, ‘सेल्फ बॅगेज ड्रॉप’ १० ते १४, ‘बोर्डिंग ब्रिज’ ८ ते ९, ‘एलिव्हेटर’ १५ ते २२, ‘एस्कलेटर’ १२ ते १७ आणि ‘इन-लाइन बॅगेज हॅंडलिंग सिस्टम’ २ ते ३ करण्यात येणार आहे. पार्किंगच्या सुविधाही वाढविण्यात येतील.
आकाशदीप यांनी सांगितले की, ऑक्टोबरमध्ये दाबोळीवर दररोज सरासरी १५,१२७ प्रवासी तसेच रोज सुमारे ६० विमान हाताळले गेले. गेल्या वर्षी येथे ७५ लाख प्रवासी हाताळले गेले होते; या वर्षी हा आकडा पार होण्याची अपेक्षा आहे. तसेच, दिल्लीतील सुरक्षा संदर्भातील घटनांनंतर विमानतळावर ‘रेड अलर्ट’ लागू असून सुरक्षा बळकटीकरणाचे पाऊले उचलण्यात आले आहेत. सध्या दाबोळी हून १९ गंतव्यस्थळांसाठी विमानसेवा उपलब्ध आहे; भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सेवा वाढविण्याचे नियोजन आहे.