गोवा खबर: गोवा पर्यटन विकास महामंडळ (जीटीडीसी) यांनी पर्यटन खाते, कला व संस्कृती खाते आणि माहिती व प्रसिद्धी खात्याच्या सहकार्याने त्रिपुरारी पौर्णिमा बोट फेस्टिव्हलसाठी विशेष टूरचे आयोजन केले आहे. हा सोहळा बुधवार, ५ नोव्हेंबर २०२५ रोजी विठ्ठलापूर, संखळी येथे पार पडणार आहे.
त्रिपुरारी पौर्णिमा हा गोव्याच्या सर्वात सुंदर आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध सणांपैकी एक आहे. वाळवंटी नदीवर या दिवशी सुंदररित्या सजवलेल्या छोट्या बोटींचे प्रदर्शन केले जाते आणि पौर्णिमेच्या चांदण्यात त्या सोडल्या जातात. या उत्सवाला दरवर्षी हजारो लोक आणि पर्यटक गोव्याची समृद्ध संस्कृती, पौराणिक परंपरा आणि कलात्मकता अनुभवण्यासाठी हजेरी लावतात.
या प्रसंगी गोव्याचे पर्यटन मंत्री श्री रोहन खंवटे म्हणाले, “त्रिपुरारी पौर्णिमा हा फक्त सण नाही, तर गोव्याच्या संस्कृतीची सलगता आणि समाजभावनेचे प्रतीक आहे. अशा उपक्रमांद्वारे आम्ही ‘रिजेनरेटिव्ह ट्यूरीझम म्हणजेच परंपरा जपत अनुभव देणाऱ्या पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत आहोत. सर्व स्थानिक आणि पर्यटकांना मी या सुंदर सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करतो.”
पर्यटन संचालक श्री केदार नाईक म्हणाले, “त्रिपुरारी पौर्णिमा हा अध्यात्म, सर्जनशीलता आणि एकतेचा संगम आहे. जीटीडीसीच्या विशेष टूरद्वारे आम्ही पर्यटकांना आणि स्थानिकांना गोव्याची पारंपरिक ओळख जवळून अनुभवण्याची संधी देत आहोत. सर्वांनी या उत्सवाचा भाग व्हावे, ही आमची विनंती आहे.”
जीटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक श्री कुलदीप अरोलकर म्हणाले,“जीटीडीसी नेहमीच पर्यटकांना गोव्याची संस्कृती आणि स्थानिक जीवनशैली अनुभवण्याची संधी देणारे टूर आयोजित करत असते. त्रिपुरारी पौर्णिमा टूर ही केवळ प्रवासाची सोय नाही, तर स्थानिक सहभाग आणि शाश्वत समारंभाला प्रोत्साहन देणारा उपक्रम आहे.”
या उत्सवासाठी जीटीडीसीने विशेष टूरचे आयोजन केले असून तो पर्यटक आणि स्थानिकांसाठी खुली आहे. या टूरमध्ये पणजी आणि म्हापश्यातील जीटीडीसी निवासस्थानांमधून आरामदायी बसप्रवासाचा समावेश आहे.
बस प्रस्थान वेळा:
• पणजी रेसिडेन्सी – रात्री ८:०० वाजता
• म्हापसा रेसिडेन्सी – रात्री ८:३० वाजता
परत येण्याची वेळ सुमारे रात्री १:०० वाजता असेल.
प्रवेश शुल्क:
• प्रौढ – ₹१५०
• ६ ते १२ वर्षे वयोगटातील मुले – ₹५०
जीटीडीसीच्या पणजी, म्हापसा, मिरामार आणि कळंगुट येथील निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या आणि ही टूर बुक करणाऱ्या पाहुण्यांना रूम भाड्यावर १०% सूट मिळेल.
अधिक माहितीसाठी किंवा बूकींगसाठी संपर्क:
• पणजी रेसिडेन्सी – +९१ ७८८ ७८९ ७५२४
• मापसा रेसिडेन्सी – +९१ ७८८ ७८९ ७५२३
या पौर्णिमेला गोव्याच्या चांदण्यात उजळणाऱ्या पाण्याचे सौंदर्य, पारंपरिक उत्सव आणि सांस्कृतिक वारसा अनुभवण्यासाठी त्रिपुरारी पौर्णिमा बोट फेस्टिव्हल २०२५ मध्ये सहभागी व्हा!