गोवा खबर:गोवा आता केवळ पर्यटन राज्य म्हणून ओळखला जात नाही, तर नवकल्पनांवर आधारित नवे रूप घेत आहे. माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि संवाद विभागाने (डीआयटीईएन्डसी) नुकतीच #एम्पावर्डईनगोवा ही मोहीम सुरू केली आहे, जी डिजिटल युगात गोव्याचे नागरिक त्यांच्या संपूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचत आहेत हे साजरे करण्याचे उद्दिष्ट ठेवते.
या लोककेंद्रित मोहिमेबाबत बोलताना गोव्याचे माहिती तंत्रज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स आणि संवाद मंत्री श्री. रोहन खंवटे म्हणाले, “गोव्याची खरी ताकद म्हणजे येथील माणसं. #एम्पावर्डईनगोवा द्वारे आम्ही केवळ डिजिटल प्रगती दाखवत नाही, तर प्रत्येक नागरिकाला या डिजिटल प्रवासाचा भाग होण्याची संधी देत आहोत. ही मोहीम म्हणजे लोक कसे तंत्रज्ञानाचा वापर करून शिकत आहेत, निर्माण करत आहेत आणि प्रगती करत आहेत याचा उत्सव आहे. प्रत्येक गोमंतकीयाने या परिवर्तनात सहभागी व्हावे आणि राज्याचे भविष्य घडवावे, हीच आमची अपेक्षा आहे.”
ही मोहीम दाखवते की तंत्रज्ञानाच्या मदतीने समाजाला कसे उन्नतीकडे नेले जात आहे, शासन सुलभ होत आहे, जीवनमान सुधारत आहे आणि नव्या संधी निर्माण होत आहेत. व्यवसाय सुरू करणे, डिजिटल कौशल्ये आत्मसात करणे, सरकारी सेवा मिळवणे, लवचिक कामाच्या संधींचा लाभ घेणे किंवा शासनासाठी नवकल्पक उपाय निर्माण करणे, या सर्वांमधून गोवा सर्वांगीण सशक्तीकरणाचा मार्ग दाखवत आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गोवा उद्योजकांसाठी काम करणे अधिक सोपे करत आहे.
डीआयटीईएन्डसीच्या माध्यमातून राज्य सरकारने आयटी धोरणांतर्गत ईज ऑफ डूईंग बिझनेस सुलभ केले असून नवीन आणि विद्यमान आयटी युनिट्ससाठी पायाभूत सुविधा आणि आर्थिक सहाय्य पुरवले जात आहे.
तसेच मोफत वाय-फाय हॉटस्पॉट्स, हर घर फायबर सारख्या उपक्रमांमुळे प्रत्येक घरात हाय-स्पीड इंटरनेट पोहोचत आहे. ग्रामीण मित्र उपक्रमाद्वारे ज्येष्ठ नागरिकांना सरकारी योजनांचा लाभ प्रवासाशिवाय मिळतो आहे. या सर्वामुळे डिजिटल प्रगती सर्वांसाठी उपायकारक बनली आहे.
या मोहिमेच्या समावेशक स्वरूपावर भर देताना डीआयटीईएनडसीचे संचालक श्री. कबीर शिरगांवकर म्हणाले, “सशक्तीकरणाची सुरुवात तंत्रज्ञान, संधी आणि ज्ञानाच्या प्रवेशापासून होते, आणि हे प्रत्येकापर्यंत पोहोचवणे ही आमची जबाबदारी आहे. महिला डिजिटल सशक्तीकरण योजना (एमडीएसवाय), आयटी क्नॉलेज सेन्टर्स, आणि गुणवंत एससी/एसटी विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप योजना अशा उपक्रमांद्वारे आम्ही डिजिटल साक्षरता गोव्याच्या दुर्गम भागांत पोहोचवत आहोत.”
राज्यातील स्टार्टअप संस्कृतीलाही या चळवळीने बळ मिळाले आहे. गोवा स्टार्टअप पलिसी २०२५ अंतर्गत उद्योजकांना सीड फंडिंग, कौशल्य प्रशिक्षण आणि पायाभूत सुविधा सहाय्य दिले जात आहे. गोवा ओपन इन्होवेशन चॅलेंज २०२५ आणि लवकरच सुरू होणारा गोवा स्टार्टअप एक्सलरेटर हा पाच महिन्यांचा कार्यक्रम स्टार्टअप्सना वाढ आणि यशासाठी मार्गदर्शन देणार आहे.
गोवा आज “भारताची सर्जनशील राजधानी” म्हणून पुढे येत आहे, जिथे प्रगती माणसांमुळे होते आणि सशक्तीकरण ही रोजच्या जीवनाची ओळख बनत आहे.
#एम्पावर्डईनगोवा ही मोहीम सिध्द करते की सशक्तीकरण हे फक्त धोरण नाही, तर सर्वांच्या सहभागातून घडणारा प्रवास आहे.