-
सायबर पोलिसांची कारवाई : दिल्लीहून संशयित गोव्यात आणला
गोवा खबर : “गोवा का हॉन्टेड एअरपोर्ट” असा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या युट्युबर अक्षय वशिष्ठला गोवा सायबर पोलिसांनी दिल्ली येथे अटक केली आहे.
वशिष्ठने “रिअल टॉक क्लिप्स” नावाच्या फेसबुक चॅनलवर मोपा विमानतळाविषयी भूत असल्याचे दावे करणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओमध्ये विमानतळाच्या धावपट्टीवर भूत फिरते, असा कथित अनुभव प्रवाशांना आल्याचा उल्लेख आहे. हा व्हिडिओ हॉरर शोसारखा थरारक दाखवण्यात आला होता आणि त्याला लाखो व्ह्यूज मिळाले.

या व्हिडिओमुळे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाची बदनामी झाल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानंतर सायबर पोलिसांनी तपास सुरू करून उपनिरीक्षक विराज सावंत आणि कॉन्स्टेबल रविचंद्र बांदिवडेकर यांच्या पथकाने दिल्लीच्या द्वारका भागातून वशिष्ठला अटक केली.
त्याच्याकडे साडेसहा लाखांहून अधिक सबस्क्रायबर्स असून त्याने यापूर्वीही भुताटकीचे व्हिडिओ तयार केले होते. सध्या त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.