गोवा खबर : राज्यातील नागरिकांना रोज किमान 10 तास पाणीपुरवठा मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पेयजलमंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. राज्यात आणखी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारले जाणार असून, लोकांच्या तातडीच्या गरजांसाठी पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न होईल, असे त्यांनी सांगितले.
पेयजल खाते नुकतेच निर्माण झाले असून, हे लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत महत्त्वाचे विभाग असल्याचे त्यांनी नमूद केले. एक दिवसही पाणी नाही मिळाले तर लोकांना त्रास होतो. त्यामुळे दिवसाकाठी किमान 10 तास पाणी मिळणे अत्यावश्यक आहे, असे फळदेसाई म्हणाले.
दरम्यान, त्यांच्याकडील अभिलेखागार व पुरातत्त्व विभाग काढून घेतला असला तरी पेयजलासारखे महत्त्वाचे खाते मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.











केंद्राच्या निधीतून वॉटर मेट्रो प्रकल्प साकार करण्याचेही त्यांनी जाहीर केले. केरळमधील कोची प्रमाणेच गोव्यातही ही संकल्पना राबविण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
खाते वाटपानंतर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना सार्वजनिक बांधकाम खाते, तर मंत्री रमेश तवडकर यांना क्रीडा, कला-संस्कृती व आदिवासी कल्याण खाती देण्यात आली आहेत.
दिगंबर कामत यांनी काम सुरू होताच बदल दिसून येईल, असा विश्वास व्यक्त केला.
रमेश तवडकर यांनी आदिवासींच्या प्रश्नांना न्याय देऊन त्यांची कला व संस्कृती देशभर पोहोचवू असे स्पष्ट केले.