Connect with us

गोवा खबर

दुर्लक्षित स्थळे सिनेमाद्वारे पुढे आणा : मुख्यमंत्री सावंत

Published

on

Spread the love

गोवा खबर : गोवा राज्य चित्रपट महोत्सव २०२५ च्या रंगतदार उद्घाटनावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिग्दर्शकांना आवाहन केले की, गोवा पर्यटनासाठी प्रसिद्ध असला तरी अजूनही राज्यातील अनेक ठिकाणे जगासमोर आलेली नाहीत. अशा स्थळांवर चित्रिकरण करून ती ठिकाणे जगभरात पोहोचवावीत.

आयनॉक्स येथे पार पडलेल्या उद्घाटन सोहळ्यात मुख्यमंत्री सावंत, आमदार व ईएसजीच्या उपाध्यक्षा डिलायला लोबो, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, महापौर रोहित मोन्सरात, गायक जॉली मुखर्जी, अभिनेते महम्मद अली आदी मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, गोव्याची खरी ओळख कोंकणी भाषेमुळे आहे. कोंकणी चित्रपटांना जागतिक पातळीवर पोहोचवणे आवश्यक असून, त्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन व अनुदानही दिले जाईल.

अभिनेते महम्मद अली यांनी यावेळी सांगितले की, जर संधी मिळाली तर ते कोंकणी चित्रपटात काम करण्यास तयार आहेत.

उद्घाटन सोहळ्यात जॉली मुखर्जी यांच्या संगीत मैफिलीने आणि सागर कारंडे व अंकुर वाथवे यांच्या हास्याविष्काराने रसिकांचे भरभरून मनोरंजन केले.

या महोत्सवात फिचर आणि नॉन-फिचर अशा दोन्ही विभागांत अनेक चित्रपटांची स्पर्धा रंगणार आहे. तसेच निलाभ कौल, पंकज सक्सेना, कंवरजीत पेंटल यांसारख्या दिग्गजांच्या कार्यशाळा आणि मास्टरक्लासही आयोजित करण्यात आले आहेत.

यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना प्रदान केला जाणार असून, १७ ऑगस्ट रोजी हा सन्मान त्यांना बहाल करण्यात येईल. आयोजकांनी चित्रपटप्रेमींना या बहुरंगी महोत्सवाचा आनंद लुटण्याचे आवाहन केले आहे.