गोवा खबर : सणासुदीच्या काळात आकाशाला भिडलेल्या नारळाच्या दरांमध्ये आता गारवा मिळणार आहे. बाजारात एका नारळाला तब्बल ७० रुपये मोजावे लागत असताना, गोवा फलोत्पादन महामंडळाने दिलासा दिला आहे. महामंडळाचे अध्यक्ष आमदार प्रेमेंद्र शेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारळ आता फक्त ४५ रुपयांत नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
गणेश चतुर्थीनिमित्त नारळाची कमतरता जाणवत असल्याने दर प्रचंड वाढले होते. यावर तोडगा म्हणून कर्नाटकातून नारळ आणण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात अवघ्या दोन दिवसांत तब्बल २५ हजार नारळ राज्यात दाखल झाले असून, त्यामुळे बाजारातील पुरवठा वाढून दर स्थिर राहण्यास मदत झाली आहे.
हे नारळ केवळ फलोत्पादन महामंडळाच्या केंद्रांवरच नव्हे, तर मोबाईल व्हॅनद्वारेही नागरिकांना सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले जात आहेत. पुढील काही दिवसांतही अशा प्रकारे कर्नाटकातून नारळांचा पुरवठा सुरू राहील.
शेट यांनी सांगितले की, कर्नाटकात मोठ्या आकाराच्या नारळाची किंमत सुमारे ४० रुपये आहे. त्यावर केवळ पाच रुपयांचा किरकोळ नफा धरून ते गोमंतकीयांसाठी ४५ रुपयांत उपलब्ध करून देण्यात आले आहेत.