गोवा खबर: तालीगावच्या एका छोट्याशा घरात, जेवणाच्या सुवासामागे एक वेगळी जिद्द फुलत होती, फक्त स्वयंपाकघरातच नव्हे, तर एका तरुणीच्या मनातही. २१ वर्षीय अॅश्लेशा मालिया, फक्त स्वयंपाक करत नाही, तर तिने केलेल्या स्वयंपाकातून ती तिचं स्वप्न, तिची झुंज आणि तिचं आत्मभान वाढतेय, प्रत्येक ताटात.
मूळ मंगळूर पण गोव्यात जन्मलेल्या अॅश्लेशाची स्वयंपाकाकडील ओढ लहानपणापासूनच लागली. एकट्या आईने वाढवलेल्या अॅश्लेशाला स्वयंपाकाची गोडी आई आणि आजीने बनवलेल्या स्वयंपाकातून लागली. “माझी आई माझं सर्वस्व आहे. ती हाऊसकीपिंग मॅनेजर होती, पण घर व मला सांभाळण्यासाठी तिने छोटीखानी कॅटरिंग सुरू केलं. मी तिच्या सोबत मदत करत करत या क्षेत्रात उतरले,” ती सांगते.
कामाक्षी कॉलेज ऑफ क्युलिनरी आर्ट्स (KCCA), वेर्णा येथे प्रवेश घेतल्यानंतर, अॅश्लेशाच्या आयुष्यात खरं वळण आलं ते Fierce Kitchens या अभिनव उपक्रमातून, जिथे शिकवण फक्त वर्गात मर्यादित न राहता, थेट फूड ट्रकच्या आनी स्वतः अनुभव घेण्याच्या विश्वात दिली जाते.

KCCA चे संस्थापक आणि Fierce Kitchens ह्या संकल्पनेचे जन्मदाते परीक्षित पै फोंडेकर, विद्यार्थ्यांना फूड ट्रक चालवण्याची संधी देतात. “ह्या उपक्रमाच्या माध्यमातून आम्हीच मेनू ठरवत होतो, त्यासाठी लागणारी खरेदी करत होतो, स्वयंपाक, सर्व्हिस, पैशाचं व्यवस्थापन, सगळं आम्हीच केलं. आणि त्यामुळे ही जबाबदारी आम्हाला अनुभव देत गेली,” असं अॅश्लेशा सांगते.
या ट्रकवर दर रविवारी घरगुती स्वयंपाक करणाऱ्या महिलांना संधी दिली जायची, यामध्ये तिच्या आईलाही एक दिवस तिच्या पदार्थांसह फूड ट्रकवर यायची संधी मिळाली. “त्या दिवशी माझ्या आईनं तिच्या हातचं जेवण विकलं. तो क्षण आमच्या दोघींसाठी अविस्मरणीय होता.”

आज ती तिच्या आईसोबत क्लाउड किचन चालवते, जिथे ती कामासाठी बाहेर गावातून आलेले, एकटे राहाणारे आणि विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार आणि परवडणाऱ्या किमतीत घरगुती जेवण पुरवते. स्वतःच्या मेहनतीतून शिक्षण पूर्ण करून परदेशात जाऊन फ्युजन कुकिंगमध्ये प्रावीण्य मिळवायचं आणि गोव्यात स्वतःचं फूड आउटलेट सुरू करायचं, हे तिचं पुढचं ध्येय असल्याचं ती सांगते.
Fierce Kitchens म्हणजे काय?
कामाक्षी कॉलेज ऑफ क्युलिनरी आर्ट्सचे संस्थापक परीक्षीत पै फोंडेकर यांचा हा विशेष उपक्रम विद्यार्थ्यांना फूड ट्रकच्या माध्यमातून उद्योजकतेचा थेट अनुभव देतो. मेनू बनवणं, त्या साठी लागणारी खरेदी करणं, स्वयंपाक, सेवा, आणि ग्राहकांशी संवाद, सर्वकाही विद्यार्थ्यांकडूनच केलं जातं.