हिंदू जनजागृती समितीची आमदार राजेश फळदेसाई यांच्याकडे मागणी
गोवा खबर : जुने गोवे येथील ‘हातकातरो खांब’ ही जुलमी पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी गोमंतकातील हिंदूंवर केलेल्या अनन्वीत अत्याचाराची साक्ष देणारी एक ऐतिहासिक वास्तू आहे. या वास्तूचे पावित्र्य अबाधित ठेवावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
आमदार राजेश फळदेसाई यांनी ‘हातकातरो खांबा’चे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी लगेच ‘हातकातरो खांब’च्या सभोवतच्या कठड्याला कुंपण बांधणार असल्याचे समितीच्या शिष्टमंडळाला सांगितले. या वेळी समितीच्या शिष्टमंडळामध्ये समितीचे राज्य संघटक सत्यविजय नाईक आदींचा समावेश होता.
‘हातकातरो खांब’ हा सध्या मजूर लोकांचे आश्रयस्थान झालेला आहे. या खांबाच्या कठड्यावर मजूर लोक झोपतात, दारू पितात असे संतापजनक चित्र त्याठिकाणी पहायला मिळते. हल्लीच या खांबाला पिवळा रंग देऊन या ऐतिहासिक खांबाची विटंबना करण्यात आली. या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीने ही मागणी केली आहे.