गोवा खबर : विदेशात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत गोमंतकीय युवकांची फसवणूक करणाऱ्या बनावट एजन्सींविरोधात सरकारने कारवाई केली असून आतापर्यंत १५ गुन्हे दाखल झाले असून १५ जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांनी या प्रश्नावर लक्ष वेधले आणि सांगितले, त्यांच्या मतदारसंघातील ३८ युवकांची फसवणूक झाली आहे. या एजन्सींनी प्रत्येकी १५-२० लाख रुपये घेतले आणि विदेशात पोहोचल्यानंतर युवकांना अडचणींचा सामना करावा लागतो.
मुख्यमंत्री म्हणाले, परराष्ट्र मंत्रालयाने केवळ नऊ एजन्सींना मान्यता दिली आहे आणि युवकांनी त्यांच्याशीच व्यवहार करावा. राज्य सरकार या संदर्भात जागृती करत आहे आणि पुढेही कठोर कारवाई केली जाईल.