गोवा खबर : भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो,गोवा यांच्या वतीने बांबोलीममधील कुजिरा येथील डॉ. के. बी. हेडगेवार हायस्कूलमध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करून कारगिल विजय दिन साजरा केला.

मेजर आयुष पाठक (5 टेक्निकल ट्रेनिंग रेजिमेंट, बांबोलीम कॅम्प) या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी मेजर आयुष पाठक यांनी उपस्थितांना संबोधित केले. विकसित भारताच्या ध्येयाकडे देशाला नेण्यात विद्यार्थी वर्गाचा महत्त्वाचा वाटा आहे, असे ते म्हणाले. “राष्ट्र उभारणीत शिक्षकांची भूमिका सर्वात महत्त्वाची असते कारण तेच देशासाठी नायक घडवतात. येथे बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भविष्यातील डॉक्टर, अभियंते, शास्त्रज्ञ आणि सैनिक दडलेले आहेत. तुमच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी, देशासाठी आपले प्राण अर्पण करणाऱ्या वीरांकडून तुम्ही प्रेरणा घ्याल याची मला खात्री आहे. या प्रसंगी आपण सर्वजण देशासाठी अतुलनीय बलिदान देणाऱ्या कारगिल युद्धातील हुतात्म्यांना अभिवादन करूया,” असे ते विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले.

भारत सरकारच्या गोवा येथील पत्र सूचना कार्यालयाचे संचालक नाना मेश्राम यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले की भारत सरकारने संपूर्ण देशभरात आज 26 वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत, हा दिवस भारताच्या इतिहासातील अभिमानाचे प्रतीक आहे. ” आजचा दिवस 1999 च्या गौरवशाली विजयाचे हे प्रतीक आहे, जेव्हा आपल्या सैनिकांनी हिमाच्छादित शिखरे आणि शत्रूच्या अथक गोळीबाराशी झुंज देत अतुलनीय धैर्य आणि अढळ निर्धारासह कारगिल शिखरे परत मिळवली होती. हा दिवस केवळ दिनदर्शिकेवरील एक तारीख नसून आपल्या सैनिकांच्या एकतेची आणि धैर्याची आठवण करून देणारा एक प्रेरणादायी दिवस आहे. हाडे गोठवणाऱ्या थंडी-वाऱ्यात लढणाऱ्या आणि प्रत्येक शिखराला आपल्या शौर्याचे प्रतिक बनवणाऱ्या सैनिकांना हा सलाम आहे,” असे ते म्हणाले.

हेडगेवार हायस्कूलचे मुख्याध्यापक विलास सातारकर यांनी कार्यक्रम आयोजित करण्यात सहकार्य केल्याबद्दल गोव्यातील केंद्रीय संचार ब्युरोचे आभार मानले. “अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात आपल्या खऱ्या नायकांकडून प्रेरणा घेण्यास प्रोत्साहन मिळेल,” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात, गोव्यातील केंद्रीय संचार ब्युरोचे प्रसिद्धी अधिकारी रियास बाबू यांनी मेजर आयुष पाठक यांचा सत्कार केला. हा सत्कार म्हणजे सशस्त्र दलाने देशासाठी केलेल्या सेवेसाठी कृतज्ञतेचे प्रतीक होता. यावेळी मुख्याध्यापक विलास सातारकर यांचाही सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात विद्यार्थी आणि गोव्यातील केंद्रीय संचार ब्युरोच्या कलाकारांनी सांस्कृतिक सादरीकरणे सादर केली. या निमित्ताने केंद्रीय संचार ब्युरोने विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, चित्रकला आणि रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. या स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या विद्यार्थ्यांनाही याप्रसंगी बक्षिसे देऊन गौरवण्यात आले.