गोवा खबर : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेत २१ हजार अपात्र आणि बोगस लाभार्थी आढळून आले असून, आतापर्यंत ६० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत. काही लाभार्थी मृत असूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा होत होते, तर काहीजण राज्याबाहेर असूनही योजना सुरू होती, असे समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांनी विधानसभेत सांगितले.
फळदेसाई यांनी सांगितले, सध्या योजनेत १.२२ लाख लाभार्थी आहेत आणि बोगस लाभार्थी वगळल्यामुळे १८ हजार नव्या लाभार्थ्यांचा समावेश शक्य आहे. दरवर्षी हयात असल्याचा दाखला सादर करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे.
त्याचबरोबर गोवा वारसा धोरण २०२५च्या अंमलबजावणीसाठी एक देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. शापोरा किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी वर्क ऑर्डर लवकरच देण्यात येणार असून, बेतुल व मुरगाव किल्ल्यांसाठी अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरू आहे.