गोवा खबर : चोडण-रायबंदर मार्गावर चोडण फेरी धक्क्यावर उद्घाटन झाल्यानंतर आज गोव्याला पहिल्या रो रो फेरी बोटी मिळाल्या. उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या फेरी बोटींचा वापरामुळे कार्बन उत्सर्जन कमी होईल असे सांगितले. गोव्यात बांधलेल्या या बोटी गोव्यातील लोकांच्या नाविन्यपूर्ण प्रतिभेचे प्रतीक आहेत. गोव्यात जहाज बांधणीच्या उध्योगास चालना मिळते आणि गोवा हे जहाज बांधणी क्लस्टर बांधण्याचे मुख्य केंद्र होईल असे ते म्हणाले.

डॉ. सावंत पुढे म्हणाले की अंतर्गत जल वाहतूकीचा अधिकाधिक वापर करणे हे प्रधान मंत्र्यांचे स्वप्न आहे. गोव्यात सार्वजनिक वाहतूक आणि पर्यटनाच्या क्षेत्रात जल मार्गाचा वापर होतो असे मुख्यमंत्री म्हणाले. रो रो फेरी बोटी सार्वजनिक- खाजगी तत्वावर हाती घेण्यात आल्या असून सरकार इतर जल मार्गांवरही त्या सुरू करण्याचा विचार करीत आहे असे सांगितले.

‘व्दारका’ आणि ‘गंगोत्री’ या दोन रो रो फेरी बोटी चोडन-रायबंदर मार्गावर सुरू केल्या आहेत आणि त्यामध्ये वातानुकूलित बसण्याची व्यवस्था, वैद्यकीय कर्मचारी इत्यादी अत्याधुनिक सुविधा असतील.
अंतर्गत जलवाहतूक मंत्री सुभाष फळदेसाई यांनी राज्यातील जनतेसाठी रो रो फेरी बोट सेवा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभेचे खासदार सदानंद तानावडे, नदी परिवहन खात्याच्या सचिवा चेष्टा यादव, मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेट, विविध पंचायतींचे सदस्य आणि इतर नागरिक उपस्थित होते.