Connect with us

गोवा खबर

आमठाणे धरणाच्या दुसऱ्या गेटचे काम अंतिम टप्प्यात : जलस्रोतमंत्री शिरोडकर यांची माहिती

Published

on

Spread the love

गोवा खबर : आमठाणे धरणातील दुसऱ्या गेटचे काम येत्या ३० जुलैपर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली आहे. त्यांनी नुकतीच या प्रकल्पाची पाहणी केली असून, सध्या काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.

धरणात सध्या पाण्याचा साठा कमी असल्यामुळे, साळ येथून शापोरा नदीचे पाणी पंपिंग करून आमठाणेत आणले जाते आणि त्यानंतर ते अस्नोडा आणि गिरी प्रकल्पासाठी वापरले जाते. या धरणाचा उपयोग केवळ पाणीपुरवठ्यासाठीच केला जातो. गेल्या फेब्रुवारीमध्ये तिळारी कालवा फुटल्यानंतर बार्देश परिसरात गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली होती. आमठाणे धरणातील गेट दीर्घकाळ लॉक अवस्थेत असल्याने पुरेशा प्रमाणात पाणी मिळू शकले नाही. नौदलाच्या पाणबुड्यांच्या मदतीने गेट उघडण्यात आला, मात्र तोपर्यंत चार ते पाच दिवस पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. या अनुभवातून धडा घेत आता दुसऱ्या गेटचे काम वेळेत पूर्ण करून नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित केला जाणार आहे, अशी माहिती जलस्रोत विभागाकडून देण्यात आली आहे.