गोवा खबर : होंडा गावात मोठ्या प्रमाणात विकास प्रकल्प राबविले जात असून, त्यामुळे गावाचा कायापालट होईल, असे मत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केले.
जीसुडाच्या वतीने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक मैदानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार डॉ. दिव्या राणे, जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, सरपंच शिवदास माडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, युवकांना आधुनिक क्रीडा सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सत्तरी तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले जातील.
या मैदानासाठी साडेतीन कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. त्यात अत्याधुनिक जिमखाना, वॉकिंग ट्रॅक आणि व्यायामशाळेचा समावेश आहे. परिसरात ४५० झाडांचे रोपण करण्यात आले आहे.
आमदार डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले, सत्तरी तालुक्यात खेळ आणि युवकांच्या विकासावर भर देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या भागात लवकरच नवीन प्रकल्प साकारले जातील.
उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांनी दीपप्रज्वलन केले, तसेच फुटबॉलला किक मारून मैदानाचे उद्घाटन करण्यात आले.