Connect with us

गोवा खबर

सडा येथील 20 खाटांच्या इस्पितळाला मंजुरी : आरोग्यमंत्री राणे

Published

on

Spread the love

गोवा खबर : मुरगाव मतदारसंघात आरोग्य क्षेत्रात लवकरच नवीन बदल दिसून येतील. आमदार संकल्प आमोणकर हे त्यासाठी काम करत आहेत. आरोग्यसेवा जनतेच्या दारापर्यंत पोचावी, अशी त्यांची संकल्पना आहे. त्यासाठी 20 खाटांचे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची फाईल मंजूर केली असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.

9 रोजी मुरगाव मतदारसंघात आयोजित केलेल्या मेगा आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. राणे काही अपरिहार्य कारणांनी शिबिराला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांनी आमदार आमोणकर यांच्या मोबाइलवरूनच उपस्थितांना संबोधित केले.

आमदार आमोणकर यांनी अनेकदा आपल्याशी संपर्क साधून सडा भागात ’डायलेसीस केंद्र’ सुरू करण्याची मागणी केली आहे. मुरगाव मतदारसंघात 20 खाटांचे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याची फाइल आपण मंजूर केली आहे. वैद्यकीय सुविधांनी परिपूर्ण प्राथमिक आरोग्य केंद्र आगामी दोन वर्षांत उभारले जाईल. तोपर्यंत सडा येथे एक जागा पाहून ’डायलेसिस केंद्र’ लवकर सुरू केले जाईल, असे राणे यांनी सांगितले.

आमोणकर यांची आरोग्य क्षेत्रातील कुठलीही कामे त्वरित पूर्ण करणार, असे सांगून पुढील दोन वर्षांत आमोणकर यांची राजकीय क्षेत्रातील कारकीर्द विस्तारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुरगाव मतदारसंघात मेगा आरोग्य शिबिराबद्दल आमदार आमोणकर यांनी आरोग्यमंत्र्यांचे आभार मानले. ते म्हणाले, ’शिबिरात 18 वेगवेगळ्या ओपीडी स्थापन केल्या असून तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करत आहेत. मेगा आरोग्य शिबिराद्वारे संपूर्ण गोमेकॉच येथे आल्यासारखे वाटते. आरोग्यमंत्री राणे यांनी 20 खाटांच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची फाईल मंजूर केली. पुढील तीन महिन्यांत सडा परिसरात प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्याच्या कामाला सुरुवात होईल.

गोवा वैद्यकीय इस्पितळाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी जनतेच्या हितासाठी राज्यभर आरोग्य शिबिरांची सुरूवात केल्याची माहिती दिली. येथील शिबिरात 600 हून अधिक लोकांची नोंदणी झाल्याचे त्यांनी सांगितले. शिबिरात नागरिकांना आजार झाल्याचे आढळल्यास लवकर उपचार करून तो दूर करण्यास मोठा फायदा होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.