गोवा खबर : अजिंक्य धर्मवीर संघटना आपल्या योद्ध्यांचा आणि राष्ट्रीय नायकांचा गौरवशाली इतिहास जतन करून तो व्यापक स्तरावर प्रसारित करण्यासाठी कटिबद्ध आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे अमर बलिदान जनसामान्यांपर्यंत पोहोचावे आणि त्यांना आदरांजली अर्पण करण्याच्या उद्देशाने बलिदान मास (२६ फेब्रुवारी ते २९ मार्च) या कालावधीत छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित माहितीपट प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
या उपक्रमाअंतर्गत पेडणे, बर्देश आणि डिचोली या तालुक्यांतील विविध ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित माहितीपट दाखविण्यात येणार आहे. संपूर्ण महिनाभर हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १ मार्च रोजी श्रीदेवी मोरजाई मंदिर मोरजी येथे सुरुवात होणार आहे. त्यानंतर २ मार्च रोजी श्री महारुद्र हनुमान मंदिर हाउसिंग बोर्ड कॉलनी पर्वरी, ७ मार्च श्रीदेवी सातेरी मंदिर हसापूर, ८ मार्च श्री सातेरी भूमिका मंदिर हळर्ण, ९ मार्च श्री वंसपुरुष राष्ट्रोळी मंदिर अडवळपाल, १६ मार्च श्री गणेश मंदिर शिवोली, २२ मार्च श्रीदेवी जरीमरी मंदिर कोलवाळ, २३ मार्च श्री सिद्धिविायक देवस्थान वन डिचोली आणि शेवटचे सत्र २९ मार्च रोजी श्री दत्तगिरी महापुरुष मठ पेडणे येथे होणार आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने कोलवाळ येथे पोस्टर अनावरण करण्यात आले. यावेळी अजिंक्य धर्मवीर संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बलिदान मास आणि माहितीपट प्रदर्शन विषयी सविस्तर माहिती दिली. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून बलिदान मासाच्या काळात प्रत्येकाने एखादी आवडती गोष्ट महाशिवरात्री ते गुढीपाडवा पर्यंत त्याग करण्याची शपथ घ्यावी, असे आवाहन अजिंक्य धर्मवीर संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी आणि धर्मसंरक्षणासाठी दिलेले अतुलनीय शौर्य, त्याग आणि बलिदान जनमानसात अधिक व्यापक प्रमाणावर पोहोचावे, यासाठी सर्व नागरिकांनी या ऐतिहासिक सत्याचा प्रचार-प्रसार करावा आणि या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.