-
पंचकर्म थेरपी विभागाचे लोकार्पण
गोवा खबर : दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता आणि वैद्यकीय सुविधांचा अभाव लवकरच दूर होणार आहे. या रुग्णालय ‘सेंटर ऑफ मेडिकल एक्सलन्स’ बनवायचे आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिली.
आरोग्यमंत्री राणे यांनी मंगळवारी जिल्हा रुग्णालयाला भेट देत पाहणी केली. त्यांच्या हस्ते पंचकर्म थेरपी विभाग सुरू करण्यात आला. त्यांच्यासोबत वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र बोरकर, आयुष विभागाचे उपसंचालक डॉ. मीनल जोशी, पंचकर्म विभागाचे प्रमुख डॉ. सुप्रिया प्रभुदेसाई धोंड आदी मान्यवर उपस्थित होते.
ते म्हणाले, रुग्णालयांमध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ संकल्पना राबवण्याची गरज असून, लोकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा वेळेवर मिळायला हव्यात. जेणेकरून हॉस्पिसिओ रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना प्रत्येक वेळी गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात जावे लागणार नाही. या रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याचा प्रलंबित प्रश्न लवकरच सोडवला जाईल. मी त्यावर काम करत आहे.
हा पंचकर्म थेरपी विभाग दक्षिण गोव्यातील आरोग्यसेवेचा मुकुटमणी बनेल, यात शंका नाही, असे मिनल जोशी यांनी सांगितले. अशी पंचकर्म सुविधा प्रत्येक तालुक्यात सुरू करू, असे त्यांनी सांगितले. सुप्रिया प्रभुदेसाई धोंड यांनी या विभागाविषयी माहिती दिली.
आयुर्वेद, पंचकर्म उपचार या पर्यायी औषधांना पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रोत्साहन देत आहेत. लोकांच्या आरोग्यासाठी आपण या उपचारपद्धती उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे मंत्री राणे म्हणाले. जिल्हा रुग्णालयातील पंचकर्म थेरपी विभाग तळघरातून वरच्या मजल्यावर हलविण्याची सूचनाही राणे यांनी वैद्यकीय अधीक्षकांना केली.