Connect with us

गोवा खबर

विकसित भारत युवा नेते संवाद 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी

Published

on

Spread the love

गोवा खबर : स्वामी विवेकानंदांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (12 रोजी) नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे विकसित भारत युवा नेते संवाद  2025 या कार्यक्रमात भाग घेतला. या कार्यक्रमात भारतभरातील 3,000 उत्साही तरुण नेत्यांनी सहभाग घेतला.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी भारतातील तरुणांच्या चैतन्यपूर्ण उर्जेने  भारत मंडपममध्ये आणलेले सळसळते  चैतन्य अधोरेखित केले. देशातील तरुणांवर अपार विश्वास असलेल्या स्वामी विवेकानंदांचे संपूर्ण देश स्मरण करत आहे आणि त्यांना आदरांजली वाहतो आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.

आज जर स्वामी विवेकानंद आपल्यामध्ये असते तर 21 व्या शतकातील तरुणांची जागृत शक्ती आणि सक्रिय प्रयत्न पाहून ते नव्या  आत्मविश्वासाने भारले असते, असेही पंतप्रधान म्हणाले.

भारतीय युवकांवर आपला प्रचंड विश्वास असून या विश्वासातूनच माय भारतच्या निर्मितीला प्रेरणा दिली आणि विकसित भारत युवा नेते संवादाची पायाभरणी केली असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील तरुणांची क्षमता लवकरच भारताला विकसित राष्ट्र बनवेल, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली.

विकसित राष्ट्र बनण्याचे ध्येय मोठे असले तरीही ते अशक्य नाही, असे सांगून नकार घंटा वाजवणाऱ्यांचे  मत त्यांनी खोडून काढले. कोट्यवधी तरुणांच्या सामूहिक प्रयत्नांनी प्रगतीची चाके फिरली की राष्ट्र निश्चितपणे आपले लक्ष्य गाठेल, असे ते म्हणाले.

मोदी म्हणाले की, कोविड-19 महामारीच्या काळात, जग लसींसाठी संघर्ष करत असताना, भारतीय शास्त्रज्ञांनी वेळेआधीच लस विकसित केली. भारतातील प्रत्येकाचे  लसीकरण करण्यासाठी 3-4 वर्षे लागतील असे भाकीत असतानाही, देशाने विक्रमी वेळेत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली असे ते पुढे म्हणाले.

भारत हा नियत कालमर्यादेच्या नऊ वर्षे आधीच पॅरिस कराराच्या वचनबद्धतेची पूर्तता करणारा पहिला देश ठरला आहे अशी माहिती देत  पंतप्रधानांनी हरित ऊर्जेबाबत भारताची वचनबद्धता अधोरेखित केली. पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रित करण्याचे उद्दिष्ट 2030 पर्यंत असले तरी भारत अंतिम मुदतीपूर्वी ते पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे असे त्यांनी नमूद केले. हे प्रत्येक यश प्रेरणादायी आहे आणि भारताला विकसित राष्ट्र बनण्याच्या ध्येयाच्या जवळ घेऊन जात आहे असे ते पुढे म्हणाले.

भारताकडे जगातील सर्वात मोठी कुशल युवा कार्यबळ असण्याची अप्रतिम संधी आहे, जी युवकांच्या स्वप्नांना खुले अवकाश प्राप्त करून देईल . या ध्येयाच्या साध्यतेसाठी प्रत्येक निर्णय, पाऊल आणि धोरण समृद्ध भारताच्या ध्येयाशी सुसंगत असले पाहिजे. तसेच, हा भारतासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे, कारण देश आगामी अनेक दशकांपर्यंत जगातील सर्वात तरुण राष्ट्र असणार आहे. जागतिक कंपन्या भारतीय युवकांच्या सामर्थ्याची स्तुती करत आहेत, कारण त्यांच्या योगदानामुळे भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ शकते,” असे मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत युवा नेते संवाद 2025 मध्ये महिला सक्षमीकरण, क्रीडा, संस्कृती, स्टार्टअप्स, पायाभूत सुविधांचा विकास आणि इतर मुद्द्यांवरील अंतर्दृष्टीपूर्ण सादरीकरणांची मालिका पाहिली. पंतप्रधानांनी भारताच्या प्रतिभावान युवाशक्तीची देशाच्या प्रगतीला चालना देण्यात आणि उज्वल भविष्य घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करत युवकांबद्दल अभिमान व्यक्त केला.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय राज्य मंत्री जयंत चौधरी, रक्षा खडसे देखील इतर मान्यवरांसमवेत कार्यक्रमाला उपस्थित होते.