गोवा खबर : गोवा फुटबॉल डेव्हलपमेंट कौन्सिलच्या (जीएफडीसी) झर्मे फुटबॉल प्रशिक्षण केंद्राचा दहावा वर्धापनदिन प्रशिक्षणार्थींना फुटबॉल किटचे वाटप करून साजरा करण्यात आला. मुलांना एकूण ६२ किटचे वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पर्येच्या आमदार व गोवा वन विकास परिषदेच्या अध्यक्ष डॉ. देविया राणे, प्रमुख अतिथी म्हणून जीएफडीसीच्या सदस्य सचिव व गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक डॉ. गीता एस. नागवेकर, केरीच्या जिल्हा पंचायत सदस्या देवयानी गवस, म्हाऊस सरपंच सुलभा बी. देसाई, पंच सदस्य गुरुदास सी. गावस, झर्मे जीएफडीसी केंद्राचे प्रमुख दत्ता गावस उपस्थित होते.
डॉ. राणे म्हणाल्या की, आज मुलांना पुरेसे प्रशिक्षण दिल्यास त्यांची जडणघडण चांगली होईल. पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहन द्यावे तसेच मुलांची प्रगती व्हावी, यासाठी केंद्रे अद्ययावत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
फुटबॉल प्रशिक्षणासाठी सत्तरीबाहेर पणजी व इतर ठिकाणी जाण्याची गरज नाही. सत्तरीतील आमच्या मुलांमध्ये शहरी भागापेक्षा जास्त टॅलेंट आहे. पोलीस प्रशिक्षणाचा विचार केला तर सत्तरीतील आमचे लोक सर्वोत्तम कामगिरी करतात हे आपण पाहिले आहे. ७ ते ८ वयोगटातील मुलांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. त्यांची प्रतिभा आपण घडवली पाहिजे आणि त्यांना सोयी-सुविधांसह मार्गदर्शन करण्याची जबाबदारी प्रशिक्षण केंद्र आणि प्रशिक्षकांची आहे. तरच ते आपले ध्येय साध्य करतील. हे खूप महत्त्वाचं आहे,” असे त्या म्हणाल्या.
पालकांनी आपल्या मुलांना प्रोत्साहित केले पाहिजे आणि ते मोबाईलवर जास्त वेळ घालवत नाहीत आणि त्याऐवजी बाहेर मैदानात वेळ घालवतात याची काळजी घ्यावी. ही मुले आपल्या गावाची, राज्याची आणि देशाची भावी पिढी आहेत, त्यामुळे आता त्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण त्यांना पुढे जाण्यास मदत करेल, असे त्या म्हणाल्या.
नागवेकर यांनी राज्यभरातील जीएफडीसीचे प्रशिक्षक व कर्मचारी यांनी फुटबॉलला कानाकोपऱ्यात नेल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. १६०० मुलगे व ६३२ मुली असे एकूण २२३२ प्रशिक्षणार्थी असून त्यांना ६६ प्रशिक्षक मार्गदर्शन करीत आहेत.
सदस्य सचिव या नात्याने राज्याच्या खेळाचा विकास करण्यासाठी आणि फुटबॉलला अधिक उंचीवर नेण्यासाठी सरकारचे, विशेषत: मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्र्यांचे सहकार्य मी वैयक्तिकरित्या अनुभवले आहे. तांत्रिक, प्रशासकीय आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांशिवाय हे शक्य झाले नसते. ग्रामीण व शहरी भागात ३५ केंद्रे आहेत. कर्मचारी अथक परिश्रम घेत असून प्रशिक्षणार्थींना भविष्यातील चॅम्पियन बनविण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे मी कौतुक करते आणि त्याचे परिणाम दिसून येत आहेत, असे त्या म्हणाल्या.
‘मुलांना खेळासाठी प्रेरित करणाऱ्या पालकांचे मी कौतुक करते. देशाचा आत्मविश्वासी तरुण म्हणून आणि सर्वांगीण विकास, सांघिक कार्य आणि नेतृत्व गुणांनी ते मोठे होत असल्याने त्याचा निश्चितच फायदा होईल, असे त्या म्हणाल्या.
या केंद्राचे व्यवस्थापन दत्ता गावस करीत असून प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षक रफिक बेपारी व सैफ अत्तार मार्गदर्शन करीत आहेत.
या केंद्रातील सिमरन गावस आणि तन्वी गावस या दोन मुली गोव्याच्या १४ वर्षांखालील मुलींचे प्रतिनिधित्व करत आहेत, तर अनमेष माजिक आणि विठोबा धरणे ही दोन मुले गोव्याच्या अव्वल क्लबकडून खेळत आहेत, हे सांगताना मला अभिमान वाटतो, असे दत्ता गावस यांनी सांगितले.