Connect with us

गोवा खबर

‘मिशन फॉर लोकल’चे पेडणेत २४ रोजी होणार उद्घाटन

Published

on

राजन कोरगावकर, प्रितम वंसकर
Spread the love
गोवा खबर : पेडणेचे सामाजिक कार्यकर्ते राजन कोरगावकर यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या `मिशन फॉर लोकल` संस्थेच्या कार्यालयाचे २४ रोजी पेडणे शहरात जुन्या बसस्थानकाजवळील मध्यवर्ती ठिकाणी उद्घाटन होणार आहे.
पेडणे तालुक्यातीलच मुळ धारगळ- शिरगाळ येथील तथा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर स्टार्टअप क्षेत्रात आपली वेगळी ओळख तयार केलेले युवा उद्योजक प्रितम वंसकर यांच्याहस्ते संध्याकाळी ३.३० वाजता हे उद्घाटन होणार आहे.
पेडणे तालुक्यातील सरकारी नोकरी न मिळाल्याने तसेच खाजगी क्षेत्रात पिळवणूक होऊन हताश झालेली युवा पिढी, रोजच्या जगण्यासाठी धडपडणारा महिलावर्ग तसेच शेतकरी, पारंपारिक व्यवसायिक, कारागिर आणि असंख्य प्रश्नांनी त्रस्त झालेली ज्येष्ठ मंडळी या सर्वांना जगण्याची एक नवी उमेद प्राप्त करून देण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे त्यांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.
कौशल्य विकास, पारंपारिक व्यवसायांना नवी उर्जा, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी संस्थेचे कार्यकर्ते वावरणार आहेत. पेडणे तालुक्यात होऊ घातलेले मेगा प्रकल्प आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नव्या संधी आणि नवी आव्हाने यासाठी तालुक्यातील लोकांना जागृत करण्याबरोबरच आपला गाव आणि आपला परिसर सुरक्षीत कसा ठेवता येईल, यासाठीही चळवळ उभारण्याचा संकल्प या संस्थेच्या माध्यमाने कोरगावकर यांनी केला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव देखावा स्पर्धा बक्षीस वितरण
या सोहळ्यानिमित्त अखिल पेडणे तालुका सार्वजनिक गणेशोत्सव इको-फ्रेंडली सजावट/ देखावा स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण केले जाईल. तसेच आरोग्याच्या समस्येमुळे उदभवलेल्या परिस्थितीत आधार मिळावा यासाठी दोघा ज्येष्ठ नागरिकांना इनरव्हिल क्लब ऑफ म्हापसा एलीटच्यावतीने व्हिलचेअरचे वितरण करण्यात येणार आहे.