Connect with us

गोवा खबर

२४ वी राष्ट्रीय पॅरा स्विमिंग स्पर्धा १९ ते २२ ऑक्टोबरदरम्यान गोव्यात

Published

on

Spread the love
  • तब्बल ५१८ स्पर्धकांचा २४व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग स्पर्धेत राहणार सहभाग
गोवा खबर : भारतीय पॅरालिम्पिक समिती आणि गोवा क्रीडा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाच्या सहकार्याने राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाद्वारे २४व्या राष्ट्रीय पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिप आयोजित होत असल्याची घोषणा केली आहे. १९ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत पणजीतील गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या ऑलिम्पिक जलतरण तलाव संकुलामध्ये ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेचा उद्घाटन समारंभ २० ऑक्टोबर २०२४ रोजी होणार आहे. या समारंभास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, क्रीडामंत्री गोविंद गावडे, दिव्यांगजन सक्षमीकरण मंत्री सुभाष फळदेसाई, गोवा राज्याचे मुख्य सचिव डॉ. पुनीत कुमार गोयल (IAS), राज्य दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाचे सचिव ई. वल्लवन (IAS), वर्ल्ड अॅक्वाटिक्स ब्युरोचे सदस्य दिगंबर कामत, राज्य दिव्यांगजन आयुक्त गुरुप्रसाद पावसकर, दिव्यांगजन सक्षमीकरण विभागाच्या संचालिका वर्षा नाईक आणि राज्य दिव्यांगजन आयुक्त कार्यालयाचे सचिव ताहा हाजिक आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
यावर्षी गोव्यात होत असलेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत २८ राज्यांमधून तब्बल ५१८ स्पर्धक सहभागी होणार आहे. गत स्पर्धेमध्ये ४६४ पॅरा जलतरणपटू सहभागी झाले होते. सहभागी पॅरा जलतरणपटू स्पर्धक संख्येचा हा विक्रम यंदाच्या स्पर्धेत मोडला जाणार आहे. सबज्युनियर, ज्युनियर आणि सीनियर अशा तीन गटांमध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेबाबत राज्याचे दिव्यांगजन सक्षमीकरण मंत्री सुभाष फळदेसाई म्हणाले, “आपण सर्वजण राष्ट्रीय पॅरा स्विमिंग स्पर्धेसाठी एकत्र येत आहोत. स्पर्धेत सहभागी होत असलेल्या खेळाडूंची खिलाडूवृत्ती आणि त्यांची जिद्द यांचा सोहळा आपण साजरा करणार आहोत. अशा प्रतिष्ठित कार्यक्रमाचे आयोजन करत असल्याचा गोवा राज्याला अभिमान आहे. प्रत्येक सहभागी स्पर्धकाला त्याच्या किंवा तिच्यामध्ये दडलेल्या पूर्ण क्षमतेचा शोध घेण्यासाठी आवश्यक असलेले सर्व पाठबळ व साधनसुविधा उपलब्ध करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ही केवळ एक स्पर्धा नाही, तर सहभागी पॅरा जलतरणपटू आणि त्यांच्या जीवनप्रवासाचा उत्सव आहे, जो आधीच यशाने व्यापलेला आहे.”
पावसकर म्हणाले, “२४वी राष्ट्रीय पॅरा स्विमिंग स्पर्धेमध्ये विविध श्रेणींमधून स्पर्धा करणाऱ्या पॅरा जलतरणपटूंची अविश्वसनीय प्रतिभा आणि दृढनिश्चय यांचे पुन्हा दर्शन घडणार आहे. हे सर्व खेळाडू त्यांच्या चिकाटी आणि ध्यासमग्न वृत्तीतून आपणा सर्वांना प्रेरणा देतात. प्रत्येक व्यक्ती आपल्यातील शारिरीक क्षमतांच्या पलीकडे जाऊन भरारी घेऊ शकेल, यशस्वी होऊ शकेल असा प्रदेश म्हणून बनलेली गोवा राज्याची ओळख आणखी ठळक करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. या उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यामध्ये व्यापक परिश्रम घेणाऱ्या आयोजन समितीचे यानिमित्ताने विशेष आभार मानावेसे वाटतात.”
स्पर्धेचे आयोजन अधिक समन्यायी व निष्पक्षपणे सुनिश्चित करण्यासाठी, पॅरा जलतरणपटूंचे वर्गीकरण त्यांच्या दिव्यंगत्वाच्या प्रकारावर आणि प्रमाणस्तरानुसार केले आहे. शारीरिक दिव्यंगत्व असलेल्या जलतरणपटूंना एस-१ (S-1) ते एस-१० (S-10) या श्रेणीमध्ये विभागण्यात आले आहे, यामध्ये एस-१ (S-1) ही श्रेणी त्या दिव्यंगत्व प्रकारातील सर्वांधिक प्रमाण असलेला स्तर दर्शविते. पॅरा जलतरणपटूंच्या शारीरिक दिव्यंगत्व प्रकारांमध्ये एक किंवा दोन्ही हात किंवा पाय नसणे, सेरेब्रल पाल्सी, पाठीच्या कण्याला दुखापत असणे, बुटकेपणा (ड्वार्फिझम) आणि सांधेजोडाचा परिपूर्ण वापर करण्यास मर्यादा आणणारे दिव्यंगत्व यांचा समावेश होतो.
दृष्टिदोष (व्हिज्युअली इम्पेअर्ड) असलेल्या जलतरणपटूंना एस-११ (S-11), एस-१२ (S-12) आणि एस-१३ (S-13) या श्रेणींमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. श्रेणी S-11 पूर्णतः अंध असलेल्या जलतरणपटूंशी संबंधित आहे; तर S-13 श्रेणी ही गंभीर, परंतु संपूर्ण दृष्टिदोष नसलेल्या स्पर्धकांची आहे. मानसिक दिव्यंगत्व असलेले जलतरणपटू एस-१४ (S-14) श्रेणीमधून स्पर्धा करणार आहेत.
प्रत्यक्ष स्पर्धा २० ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहेत. या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण सोहळा २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे.